आधुनिक काळातील शिक्षण आणि रोजगार



Quora.com प्रश्न - आपण शिक्षण का घेतो, शिक्षणावर एवढा पैसा खर्च करून काही उपयोग आहे का?


उत्तर - 
माझ्या मते पालकांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे जास्त ओढाताण न करता मुलांचे पदवीपर्यंत शिक्षण करावे.

पदवी मिळवण्यासाठी कर्ज करून शिक्षणसम्राटांच्या मढ्यावर पैसे घालू नयेत.

शिक्षणाचा उपयोग आहे. पण शिक्षण आणि पदवीचे ढेंडोळे यात फरक आहे.

आताच्या काळामध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी कौशल्य जास्त महत्त्वाचे आहे. IIT, NIT, IIM सारख्या संस्थेमध्ये पदवी असेल तरच त्या कॉलेज च्या नावाचा काहीतरी उपयोग आहे. आणि या कॉलेजेस मध्ये, बुद्धिमत्तेच्या बळावर ऍडमिशन मिळत असेल तर तो विद्यार्थी पालकांनी थोडा ताण घेऊन शिक्षण पूर्ण करण्याच्या लायकीचा आहे हा एक सरधोपट नियम समजा.

या कॉलेजेस व्यतिरिक्त कुठेही फार जास्त पैसे करून शिक्षणाच्या मागे लागू नये.

मग काय शिक्षण सोडून द्यायचे?

नाही. पदवीपर्यंत शिक्षण वाजवी दरात उपलब्ध आहे अशा संस्थेमधून करावे. वाचलेले पैसे वापरून, पदवी करता करता कोणताही व्यावसायिक कोर्स करावा. प्लम्बर, मेकॅनिक, फर्निचर काम, इलेक्ट्रिशियन, कॉम्प्युटर हार्डवेयर, सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर असे कोर्स करून कुठेतरी इंटर्नशिप चालू करावी. या व्यावसायिक तज्ज्ञांना खूप मागणी आहे आणि वाढत राहणार आहे. AI मुळे व्हाईट कॉलर जॉब कमी होत जातील पण या कामांना मागणी असणारच आहे.

आणखी एक चांगले क्षेत्र म्हणजे नर्सिंग. आजकाल पालक डोळे फिरतील एवढ्या देणग्या देऊन मुला मुलींना डॉक्टर बनवायला निघाले आहेत. श्रीमंतांनी केले तर ठीके, पण अगदी मध्यमवर्गीय पालक देखील आपल्या साधारण गुण असलेल्या मुलामुलींसाठी जीव मेटाकुटीला आणत आहेत. त्यापेक्षा मुलांना/ मुलींना नर्सिंग मध्ये जाऊद्या. मेडिकलच फिल्ड आहेना शेवटी?

सर्वात महत्वाचा मुद्दा -

या वाचलेल्या पैशाचा थोडका भाग वापरून या मुलामुलींना चांगले इंग्रजी शिकवा. किमान इंग्रजी तर चांगली झालीच पाहिजे. पाश्चात्य देश म्हातारे होत चालले आहेत, आणि जन्म दर रसातळाला गेला आहे. तिथे कौशल्य असलेल्या, मुले जन्माला घालून लोकसंख्या वाढवणाऱ्या तरुणांची गरज आहे. आणि ही गरज वाढत आहे. AI जी कामे करू शकणार नाही, आणि जिथे माणूसच लागतो जसे नर्सिंग, प्लम्बिंग, इलेक्ट्रिशियन अशा क्षेत्रांमध्ये इंग्रजी येत असेल आणि अनुभव असेल तर कॅनडा, युरोपीय देश, जपान, मिडल ईस्ट देशांचे पटकन विसा मिळून जातील. व्यावसायिक कौशल्य असेल तर स्वतःचा व्यवसाय करू शकतात. आज चांगले प्लम्बर, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे त्यांना मिळणारा मेहनताना देखील चांगला होत आहे. फुटकळ डिग्र्या मिळवून बोंबलत हिंडण्यापेक्षा हे पर्याय कधीही चांगले आहेत.





---
चित्रे pixabay.com वरून साभार

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक