सावध ऐका पुढल्या हाका


खालील लेख हे मी Quora.com च्या मराठी साईट वर लिहिलेले या प्रश्नाचे उत्तर आहे.
मी अभिनय किंवा क्रिकेट खेळत जास्त पैसे कमवू शकत असल्यास मी अभ्यास का करावा?

-*-

या प्रश्नावर आलेली आधीची उत्तरे सुंदर आहेत. त्यातीलच एक मुद्दा अधोरेखित करण्यासाठी हे माझे उत्तर देत आहे.

"कमवू शकत असल्यास" यात शक्यता आहे. अजून तशी परिस्थिती नाही असे गृहीत धरतो.

इंग्रजी कोरा वर प्रो.रिचर्ड म्युलर हे एक भौतिकशास्त्रज्ञ लिहितात. विज्ञानाबरोबरच त्यांची इतर उत्तरेही अतिशय वाचनीय असतात. त्यातील हे उत्तर नक्की वाचा.

Answer from prof. Richard Muller.[1]

इथे थोडक्यात सांगायचे म्हंटले तर एखाद्या क्षेत्रामध्ये गुणवत्तेची उतरंड (किंवा चढण म्हणा हवेतर) असते. काही लोक प्रचंड कुशल असतात आणि पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळून धन्य होतात. पैसा आणि प्रसिद्धी या दोनच गोष्टी सोयीसाठी विचारात घेऊ. नशिबाचा भाग सोयीसाठी बाजूला ठेवू.

कुठलाही क्षेत्रात सर्वस्वाचा त्याग करून उडी घेण्याआधी हा विचार जरूर करा की तुम्ही जर त्या क्षेत्रामध्ये दहावे, शंभरावे, दहा हजारावे, एक लाखावे किंवा दहा लाखावे कुशल व्यक्ती झालात तर काय? तुमचे आयुष्य तुम्हाला सुखासुखी जगता येणार असेल तर ती जोखीम घ्या. असे नसेल, तर पर्याय ठेवणे कधीही उत्तम.

आता माझे अनुभव सांगतो
माझा एक मित्र क्रिकेट उत्तम खेळायचा. स्पिनर तर होताच, फलंदाजीची चांगली होती. शालेय क्रिकेटमध्ये एकदा त्याने १७० धावा काढल्या. घरी येऊन वडिलांनी कौतुकाऐवजी "अभ्यासाकडे लक्ष द्या" वगैरे वगैरे सुनावले. त्याला किती वाईट वाटले असेल याची कल्पना आली असेल.

या घटनेननंतर त्याचे क्रिकेट कमी झाले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन, काही काळ पुण्यात नोकरी करून तो एमएस करायला अमेरिकेला गेला आणि सिलिकॉन वॅली मध्ये स्थायिक झाला आहे.

गम्मत अशी कि तिथल्या हौशी क्रिकेट क्लब मध्ये आतासुद्धा पुरेपूर क्रिकेट खेळतो. अगदी आंतरराज्यीय टूर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द मॅच वगैरे मिळवतो.

आर्थिक स्थिती नक्कीच खूप चांगली आहे. आणि त्याचा छंदही सुंदर रित्या जोपासला आहे.

फक्त क्रिकेटवर लक्ष देऊन कदाचित रणजी मध्ये गेला असता किंवा आयपीएल मध्ये नंबर लागला असता. आयपीएल मध्ये जर अ दर्जाचा खेळाडू असता तरच आत्तासारखी आर्थिक परिस्थिती मिळवू शकला असता. आता अ दर्जाचा खेळाडू व्हायला त्याला किती मेहनत आणि किती काळ वाट बघावी लागली असती कोणाला माहिती? वर ३४ वयापर्यंत तर खेळ संपला असता.

तो त्याच्या आयुष्यात किती सुखी आहे हे त्याला माहिती. पण पैसे तर उत्तरोत्तर वाढणारच आणि छंद देखील (पस्तिसाव्या वर्षी) जपता येतोय हे चांगलेच आहे.

खेळ, अभिनय ही क्षेत्रे आकर्षक वाटतात कारण तिथे पैसा आणि प्रसिद्धी माध्यमांतून दाखवली जाते. पण किती जण तेंडुलकर आणि कोहली होतात? सुरवातीचे १०, १०० क्रिकेटर सोडून बाकीचे तर पूर्णवेळ खेळत नसतील. पोटापाण्यासाठी काहीतरी व्यवसाय नोकरी करावीच लागणार. अशा वेळी चांगले शिक्षण सोबतीला असेल तर वाईट कुठे?

आणि कोहलीला तुम्ही बोलताना बघा. चांगला बोलतो, उत्तरोत्तर चांगल्या, संयत मुलाखती देतोय. त्याचे शिक्षण माहित नाही पण त्यालादेखील या वयात इतक्या श्रीमंतीत अभ्यासातून सुटका नाही. कितीही चांगला क्रिकेटपटू असला तरी समाजकारणाचे भान ठेवावे लागते. देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळातल्या नैपुण्याबरोबर आणखीही गुण लागतात. अंगात सुसंस्कृत आणि सुशिक्षित पणा असला तर यश टिकवता येते.

मायक्रोसॉफ्ट चे सीईओ सत्या नडेला हे कॉलेजमध्ये क्रिकेट टीम चे कॅप्टन होते[2]. त्यांनी म्हंटले आहे की क्रिकेट मधून शिकलेल्या गुणांचा त्यांना नेतृत्व करण्यासाठी फायदाच झाला. त्यामुळे अगदी खेळूच नये हेही काही पालकांचे धोरण चुकीचेच आहे.

तर पैसा हेच ध्येय असेल तर नक्कीच सर्वस्व पणाला लावून एखाद्या गोष्टीच्या मागे लागू नका. शिक्षणाचे वय मर्यादित असते. अशा वेळी सारासार विचार करा. क्रिकेट आणि अभ्यास यात निवड करायची वेळ येत असल्यास आपण आळशीपणा करत नाहीयेना याची खातरजमा करा. क्रिकेटचा बहाणा आपण अभ्यासात टाळाटाळ करण्यासाठी देत आहोत का? स्वतःचीच फसवणूक करत आहोत का? हे तपासा. आणि आईवडिलांचे देखील ऐका.

_*_

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक