टोस्टमास्टर्स - सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो
मी काही काळ टोस्टमास्टर्सचे सदस्यत्व घेतले होते त्यामुळे उत्तर देत आहे.
टोस्टमास्टर्स ही एक चळवळ आहे. उत्कृष्ट वक्ता घडवणारी चळवळ.
डॉ जॉर्डन पीटर्सन म्हणतात की उत्तम कौशल्य आणि आपले विचार स्पष्ट, सुसंगत पद्धतीने मांडण्याची कला ज्याने आत्मसात केली त्याला आयुष्यात कोणी रोखू शकत नाही.
सुसंगत बोलण्याची कला आणि विचार करण्याची सवय ही सरावाने तयार होते. नुसत्या बोलण्याचा सराव केला तर "आज या ठिकाणी उपस्थित माननीय" च्या पुढे प्रगती नाही. विचार करून, मुद्देसूद बोलणे आपले म्हणणे दुसर्यापर्यंत पोहोचवणे याचा सराव महत्वाचा.
एका सर्वेक्षणानुसार लोकांना सर्वात जास्त भीती सभेत बोलण्याची वाटते. दुसऱ्या क्रमांकावर मृत्यूचे भय आहे. याचाच अर्थ बरेच लोक सभेत गर्दीसमोर बोलणे आणि मृत्यू पत्करणे यापैकी दुसरा पर्याय स्वीकारतील. इतका हा पब्लिक स्पीकिंग चा फोबिया बळकट आहे.
अशा या अवघड कौशल्यावर सभेमध्ये सराव करणे हा एकच उपाय आहे. पण अशी सभा तुमच्यासाठी कोण जमवणार हो? आणि ते लोक तुम्हाला का खपवून घेणार? पण यावर उपाय काय?
तुमच्यासारखेच वक्तृत्व कौशल्यावर सराव करायला इच्छुक लोक एकत्र आले तर? त्यांनी एकमेकांना प्रोत्साहन, सूचना, शिस्त दिली तर? याच उपक्रमाचे नाव टोस्टमास्टर्स.
अमेरिकेत चालू झालेली ही चळवळ आज संपूर्ण जगात पसरली आहे. शेकडो शहरामध्ये याच्या शाखा आहेत आणि तिथली स्थानिक मंडळी या क्लब च्या नियमांना धरून आपापल्या शाखा चालवतात. पुण्यामध्ये या क्लब च्या माझ्या माहितीप्रमाणे 10 पेक्षा जास्त शाखा आहेत.
टोस्टमास्टर्स क्लब मध्ये तुम्ही गेलात तर काय होते?
सर्वप्रथम जाणून घ्या की या क्लबचे सभासद होण्यासाठी तुम्ही सज्ञान - 18 वर्षे पूर्ण व्यक्ती असायला हवेत. वरिष्ठ वयाची अट नाही. तरुणांपासून अगदी निवृत्त झालेले व्यक्ती सभासद बनू शकतात. ही संस्था इंग्रजीमधून वक्तृत्वगुण विकसित करणाऱ्यांसाठी आहे. 20 ते 50 जणांची एक शाखा असते. हे लोक नियमित म्हणजे आठवड्यातून किंवा दोन आठवड्यातून एकदा ठरलेल्या ठिकाणी, जसे एखाद्या सभासदाच्या मालकीचा हॉल, महाविद्यालय किंवा कार्यालयाचा लेक्चर हॉल येथे जमतात.
इथे तुम्ही गेलात तर तुम्हाला गेस्ट म्हणतात. एक गेस्ट च्या रुपात तुम्हाला क्लब चे कामकाज कसे चालते हे बघायला मिळते. त्यासाठी सभासद होण्याची आवश्यकता नाही. गेस्ट म्हणून तुम्ही किती वेळा येऊ शकता यावर बंधन नाही.
ज्यावेळी क्लब ची ही आठवडी सभा असते, त्यावेळी काटेकोर टोस्टमास्टर्स च्या सनदेप्रमाणे कामकाज चालते. सभेचा एक अध्यक्ष असतो, एक यजमान असतो, त्या दिवसाचे वक्ते असतात, त्यांचे मूल्यमापन करणारे, व्याकरण तापसणारे, वक्ता किती वेळेला अंम, अहं, यू नो असे करत अडखळतो हे मोजणारे, वेळेची नोंद ठेवणारे सदस्य असतात. हे रोल अथवा पात्र कोण उचलणार हे आदल्या मीटिंग मधेच ठरलेले असते. हे रोल आलटून पालटून सर्वच सदस्य साकारत असतात. त्यामुळे सर्वांना काहींना काही काम असते. जर आदल्या सभेत रोलची जबाबदारी घेतलेला सदस्य काही कारणाने अनुपस्थित असेल तर त्याची जबाबदारी दुसऱ्या कोणा सदस्याला दिली जाते.
प्रत्येक सभासदाला एक प्रगतीपुस्तक दिलेले असते. त्या प्रगतीपुस्तकातील एक एक आव्हान पार करायचे असते. सुरुवातीला तुमच्याबद्दल 5 मिनिटे बोला, विनोदी कथा, गंभीर विषय, माहितीपूर्ण भाषण अशा पद्धतीची ही आव्हाने असतात. एक नवीन सदस्य कितीही कालावधी घेऊ शकतो ही आव्हाने पूर्ण करण्यासाठी. पण त्या सदस्याला प्रेरित करण्यासाठी, त्याचे वेळापत्रक बघण्यासाठी एक दुसरा अनुभवी सदस्य मेंटर किंवा मार्गदर्शक मित्र म्हणून नियुक्त केलेला असतो.
सर्वसाधारण पणे एका बैठकीत 3 वक्ते आपापली त्या आठवड्यातील आव्हाने पूर्ण करतात. वेळ नोंद करणारे त्यांना भाषण 5 मिनिटांचे असेल तर साडेचार मिनिटाला पिवळे, लाल बोर्ड दाखवतात. जेणे करून त्यांचा वेळेत आपले विचार सांगण्याचा सराव होतो. अनुभवी सदस्य त्याचे मूल्यमापन करतात आणि ते आव्हान पूर्ण झाले किंवा परत आणखी चांगला प्रयत्न करावा असा शेरा देतात. व्याकरण निरीक्षक त्यांचे शेरे देतात.
आलेल्या गेस्टस म्हणजे ज्यांनी अजून सभासदत्व घेतले नाही अशा लोकांसाठी देखिल एक उपक्रम असतो. तो म्हणजे 2 मिनिटांचे उस्फूर्त भाषण. याची सक्ती नसते. कुणी सभासद आपल्या कल्पनेनुसार 4 ते 5 विषय निवडतो, त्याच्या चिठ्ठ्या केल्या जातात. पाहुण्यांना त्यातून एक चिठ्ठी निवडायची असते आणि मिळालेल्या विषयावर सभेसमोर बोलायचे असते. पाहुणे अडखळतात, चूका करतात, संकोच करतात पण अनुभवी सदस्य त्यांना प्रोत्साहन देतात. शेवटी ते देखील असेच कधीकाळी सभेसमोर उभे राहतात संकोच करणारे व्यक्ती असतात.
सगळं उत्कृष्ट असले आणि बऱ्याच जमेच्या बाजू असल्या तरी काही कमतरता देखील आहेत. माझ्या निरीक्षणाप्रमाणे, जे लोक बहिर्मुख (extrovert) आहेत ते पटकन रमून जातील पण अंतर्मुख व्यक्तींना सामावून घेण्यासाठी वेगळे प्रयत्न दिसले नाहीत.
व्याकरणाच्या चुकांबरोबर बरोबरच, बोलताना अडखळण्याचा देखील स्कोर ठेवला जातो. हेतु सुधारणा व्हावी हाच असतो, पण कच्च्या वक्त्यांना हे जाचक वाटू शकते. बोलण्याच्या ओघाला (fluency) ला जास्त महत्व दिल्यामुळे विचारांची गुणवत्ता दुय्यम स्थानावर जाते.
पण तरीही, या क्लब च्या फायद्यांपुढे या गोष्टी काहीच नाहीत आणि एकदा तुम्ही वक्ता बनण्याच्या प्रवासाला सुरुवात केलीत तर वरील गोष्टींचा जाच वाटणार देखील नाही. याशिवाय, कसलेल्या सदस्यांसाठी शहर, जिल्हा, राज्य, देश आणि जागतिक पातळीवर देखील स्पर्धा असतात. त्यावेळी ओघवती शैलीबरोबर, विचारांची गुणवत्ता देखील नक्कीच सुधारत असणार.
अशी ही उपयुक्त अशी टोस्टमास्टर्स संस्थेची कहाणी.
अधिक माहितीसाठी त्यांचे संकेतस्थळ पहा. तुमच्या आजूबाजूला कोणती शाखा आहे हे पाहण्यासाठी पहा. विकिपीडियावर या संस्थेबद्दल आणखी माहिती मिळेल. सभासद होण्यासाठी सहामाही शुल्क असते. सभासदांना भाषणकौशल्य आणि नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठीच्या आव्हानांचे प्रगतीपुस्तक, नियमावली आणि माहीतीपुस्तक दिले जाते.
मी हडपसर च्या अमनोरा जवळील शाखेत काही वेळा जात होतो. त्यानंतर दुसरीकडे राहायला आल्यावर मी जाणे बंद केले. टोस्टमास्टर्स मध्ये शाखा कशी चालवतात हे बघून त्या धर्तीवर आमच्या ऑफिस मध्ये आम्ही प्रेझेन्टेशन कौशल्यावर मेहनत घेण्यासाठी एक क्लब चालवला होता. अशा प्रकारे सदस्यांनी शाखेचे कामकाज बघिल्यामुळे वक्तृत्वाबरोबरच नेतृत्वगुणांचाही विकास होतो असे मला वाटते.
_*_
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!