नास्तिक आणि अज्ञेयवादी



नास्तिक आणि अज्ञेयवादी यांच्यामध्ये काय फरक आहे?

व्वा.. अज्ञेयवाद. नवीन मराठी शब्द समजला आज.

Atheist - नास्तिक म्हणजे जे देवाचे अस्तित्वच मान्य करत नाही असे लोक. त्यांच्या मते विश्वाचा पसारा, ही सृष्टी, उत्क्रांतीची सुरुवात हे केवळ एका वैश्विक योगायोगचा (cosmic coincidence) परिणाम आहे. इथे एक ठराविक कार्यकारण भाव आहे आणि दैव किंवा देव अशी कोणतीही गोष्ट सृष्टीत अस्तित्वात नाही असे यांचे ठाम मत असते.

Agnostic - अज्ञेय म्हणजे असे लोक की जे मान्य करतात की काही गोष्टी अगम्य आहेत. कार्यकारणाचे नियम तिथे लागू होत नाहीत आणि अशा गोष्टींना फक्त वैश्विक योगायोग मानणे त्यांना चुकीचे वाटते. अशा लोकांच्या मते काहीतरी अगम्य शक्ती या सृष्टीमागे कार्यरत आहे पण ती परंपरेनुसार चालत आलेल्या देवाच्या कल्पनेसारखी नसून वेगळी असू शकते.

मी स्वतःला अज्ञेय मानतो. देवाच्या अस्तित्वाचा शास्त्रीयदृष्ट्या पुरावा देता येत नसला तरी तो नसल्याचा ठोक पुरावाही देता येत नाही. पण त्यामुळे मला देव मानायलाच पाहिजे असेही नाही.

अज्ञेय असल्यामुळे मी देवळात पण जातो आणि अनाठायी कर्मकांड करायला नाही पण म्हणू शकतो. हे निर्णय घ्यायला बरीच बुद्धी खर्ची पडते. त्यामुळेच जे लोक सरधोपटपणे देव आहे किंवा नाहीये हे गृहीतक धरून जगणे सोपे ठेवतात त्यांच्याबद्दल आकस नाही.

माझ्या मते नास्तिक लोकही स्वतःचा एक धर्म पाळत असतात. कुठल्याही जटिल गोष्टीला (उदाहरणार्थ मानव शरीर संरचना) वैश्विक योगयोग म्हणून डोळे बंद करून मानणे हे देखील अंधविश्वास ठेवल्या सारखेच आहे.

अज्ञेय असल्याचा उपयोग म्हणजे तुम्ही प्रत्येक अनुभव खुल्या मनाने समजून घ्यायचा प्रयत्न करू शकता. एकदा का तुम्ही सगळे देवामुळे होते म्हंटले की बुद्धीची द्वारे बंद होतात. नास्तिक असला, आणि जिथे विज्ञानाच्या मर्यादा येतात अशा गोष्टींना देखील अनाठायी गृहितकांच्या आधारे गळी उतरवायचा प्रयत्न करत असाल, तर हेही माझ्यालेखी बुद्धीची द्वारे बंद करण्यासारखेच आहे.

सृष्टीमध्ये घडणाऱ्या घटना या इतक्या गुंतागुंतीच्या आहेत, उदाहरणार्थ - पर्जन्य, ऋतू, महासागरातले प्रवाह, प्राणिजगत, शरीर संरचना, मधमाशांचे परागवहन, किरणोत्सार. बऱ्याच गोष्टी विज्ञानाने समजावता येऊ शकल्या तरी या सर्वांचे प्रयोजन काय हा प्रश्न उरतोच. वर सर्व गोष्टी सुंदरपणे एकमेकांसोबत एखाद्या जिगसॉ कोड्याप्रमाणे चपखल बसल्या आहेत. यांना फक्त एक वैश्विक योगायोग मानणे खरेतर बुद्धीला पटत नाही. आणि गोष्ट समजत नाही म्हणून "ते देवाचं असतं" म्हणून सोडून देणेही.

माझ्या मते आपल्या आजूबाजूला जरी देव मानणारे पुष्कळ लोक असले तरी खरेतर बरेच मुळात आस्तिक नसावेत. कारण देवाला मनापासून मानत असते तर दुसर्यांसाठी दु:खजनक गोष्टी करताना हजार वेळा विचार केला असता. सोयीनुसार देव मानणे याला काय म्हणावे? काही लोक "देवाचं असतं" म्हणून समाजामधील बऱ्याच अपप्रवृत्तींनाही विरोध करत नाहीत. उदाहरण द्यायचे झाले तर आमच्या सोसायटी मधे सांडपाणी प्रक्रिया करणारे यंत्रणेला दुरुस्तीची आवश्यकता आहे. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न आहेत पण सोसायटी कडे पुरेसा निधी नाही म्हणून ते काम पडून आहे. याच सोसायटीने गणपतीत 3 लाख खर्च केले आणि त्यातले 40 हजाराचे नुसते ढोल बडवले. याविरोधात बोलणाऱ्याला "देवाचं असतं" म्हणून गप्प करणे आपल्याकडे फार सोपे आहे. अर्थात गणपतीच्या नावे वर्गणी देणारे आरोग्यासाठी वर्गणी देतीलका हा प्रश्न आहे. असो विषय भरकटला.

एक कुतूहलाचा भाग असा की जसेजसे विज्ञान विकसित होत आहे तसेतसे आपल्याला विश्वाचा पसारा अनंत आहे अशी जाणीव होत आहे. अशा अनंत विश्वाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात केवळ योगायोगामुळे कुठलीही गोष्टी होणे हे गणितीय दृष्ट्या शक्य आहे. विज्ञानात कोणत्या गोष्टी अजून मनुष्याच्या आकलनाबाहेर आहेत या विषयावर "वुई हॅव नो आयडिया" हे अतिशय रंजक पुस्तक आहे.


टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक