मला (न) समजलेले बाबा





तुम्ही अलीकडे कोणते पुस्तक वाचले आणि त्याबद्दल तुमचा काय अभिप्राय आहे?


मी २०१९ च्या मार्च महिन्यात डॉ प्रकाश आमटे जिथे कार्यरत आहेत अशा हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली.

बाबा आमटे, त्यांची समाजासाठी आयुष्य अर्पण केलेली डॉ विकास आणि प्रकाश आमटे ही मुले, डॉ भारतीताई आणि मंदाकिनी या कर्तृत्ववान सुना, सेवापरायण परिवार आणि निष्ठावंत, सेवाखोर कार्यकर्ते याबद्दल माहिती नसणारी व्यक्ती विरळाच. (सेवाखोर हा बाबा आमटेंच्या एका कवितेत आलेला शब्द आहे. The one who cannot help but help)

चंद्रपूर जवळचे आनंदवन आणि गडचिरोली च्या निबिड अरण्यातले हेमलकसा याबद्दल खूप काही सांगण्यासारखे आहे. ते कधीतरी दुसऱ्या पोस्ट मध्ये.

डॉ प्रकाश आमटे यांच्या प्रकाशवाटा ही आत्मकथा मी तिथे जाण्याअगोदरच वाचली होती.

तिथे गेल्यावर मी आणखी काही पुस्तके घेतली. त्यात डॉ प्रकाश आमटेंचे हेमलकसा येथील सहकारी आणि बाबा आमटेंसोबत बराच काळ व्यतीत केलेले विलास मनोहर यांची दोन पुस्तके होती.

त्यातले नेगल हे पुस्तक मी लागोलाग वाचून काढले. नव्वद च्या दशकात शाळेत असताना हे पुस्तक आमच्या शाळेच्या ग्रंथालयात खूपच विद्यार्थीप्रिय होते. तेव्हा फक्त त्या पुस्तकातील फोटोच पाहिल्याचे आठवते.


डॉ प्रकाश आमटे, लेखक विलास मनोहर आणि हेमलकसा इथले कार्यकर्ते यांचे जंगली प्राण्यांवरचे प्रेम, आदिवासी आणि त्याच्या सहानुभूती, कारुण्य, आणि विनोद यांनी भरलेल्या सुरस कथा ही या पुस्तकाचे वैशिठय आहे. श्री विलास मनोहर स्वतःला लेखक समजत नाहीत आणि हे त्यांचे पहिलेच पुस्तक. त्यामुळे भाषा बोजड न वाटता आपल्या जवळची वाटते.

पुण्यात घरी आल्यावर मी श्री विलास मनोहर यांचे आणखी एक पुस्तक - “मला (न) समजलेले बाबा” वाचले. बाबा आमटे यांच्या निकट तब्बल एक दशकाहून अधिक काळ लेखक राहिले. तसे 30 वर्षांहून अधिक काळ ते बाबांना परिचयाचे होते. या पुस्तकात त्यांनी बाबांचे सहायक म्हणून निरीक्षण केलेले वेगवेगळे पैलू मांडले आहेत.


नर्मदा बचाव आणि भारत जोडो यात्रा सारख्या आंदोलनात बाबांसोबत त्यांचे सेवक म्हणून राहिलेल्या विलास यांनी अशांत अशा या पर्वात बाबांची काळजी तर घेतलीच वर त्यांच्या संवेदनशील तरीही व्यावहारिक मनाने या काळात जी निरीक्षणे नोंदवली आहेत ती खरेच एक ठेवा आहेत. त्यातून महापुरुषांच्या मधला सामान्य माणूस दिसतो आणि सामान्य माणसातला महापुरुषही.

आनंदवनाशी जोडलेली ही पुस्तके म्हणजे खरेच माझ्यासाठी एक समज विस्तारणारी गोष्ट आहे.


बाबांच्या स्पर्शाने पवित्र झालेल्या आणि माणुसकीच्या श्रमाने भिजलेल्या या भूमीत डॉ मंदाकिनी, प्रकाश आमटे, समाज बांधणीच्या त्यांच्या व्रताचा वारसा चालवणारा त्यांचा परिवार, आणि कार्यकर्त झालेली ही भेट ही मला आयुष्यभर एक सुखद आठवण राहील.

गंमत म्हणजे मला ज्यांचे लेखन खूप आवडले ते श्री विलास मनोहर दोन तीन वेळा आम्हाला दिसले नमस्कार करून आम्ही पुढेही गेलो, परंतु कोणीही त्यांना ओळखले नाही. ओळखले असते तरी काय केले असते ठाऊक नाही, कारण त्यांची पुस्तके वाचून असे वाटत नाही की त्यांना हवशे नवशे आणि त्यांचे फ्याणडम यांच्यात काही रस असावा.


आमटे परिवारासोबत हा आमचा फोटो या भेटीची नेहमीच सुखद आठवण करून देत राहील. मी हातात प्रकाशवाटा घेतले आहे.

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक