धरलं तर चावतंय





उत्तर देण्याआधी प्रश्नकर्त्याला नक्की काय अभिप्रेत आहे ते पाहावे लागेल. हा प्रश्न नक्कीच पांढरा-काळा प्रकारातला नाही. परिस्थितीनुरूप उत्तर बदलू शकते. प्रयत्न करतो.



इथे डाउनलोड करून पाहणे म्हणजे "पायरेटेड प्रत बघणे" असा अर्थ असेल तर मी त्याच्या 80% विरोधात आहे. बाकीचे 20 टक्के कुठे गेले समजण्यासाठी पूर्ण उत्तर वाचावे लागेल.

जर स्ट्रीमिंग सेवा जसे नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ऍमेझॉन प्राईम, झी5 वर चित्रपट पाहायचा असेल तर काहीच हरकत नसावी. गूगल प्ले वर देखील अतिशय रास्त दरात भाड्याने सिनेमा उपलब्ध करून देते. अशावेळी आपण या स्ट्रीमिंग माध्यमांनी सिनेमा बघितला तर त्याचा योग्य मोबदला निर्मात्यांना मिळत असतो.

ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्राजक्ता माळी चा हम्पी हा सुंदर सिनेमा बघण्यासाठी मी झी5 चे वर्षभराचा रतीब घेतला. संभाजी आणि चला हवा येऊ द्या ब्रेक फ्री बघता येते आणि याच्या नवऱ्याची त्याची काय ते आईला मोबाईल वर लावून देऊन पैसे वसूल करतो.



बाहुबली, पानिपत किंवा इंटरस्टेलर सारखे भव्य चित्रपट टीव्ही वर बघण्यात आणि सिनेमागृहात बघण्यात खूप अंतर आहे. अशा सिनेमांना टीव्ही वर पाहणारे बराच आनंद गमावतात.

काही वर्षांपूर्वीपर्यंत बरेच जुने नवे हॉलीवूड चे सिनेमे पाहण्याचा पायरेटेड सिनेमाशिवाय दुसरा मार्ग नव्हता. एकतर स्ट्रीमिंग सेवा भारतात उपलब्ध नव्हत्या. आणि दुसरे म्हणजे आजच्यासारखे स्वस्त, वेगवान आणि सर्वत्र पोहोचलेले इंटरनेट नव्हते. मग एकमेकांनी रात्रभर डाउनलोड करून ठेवलेले चित्रपटांचे संग्रह एकमेकांच्या पेनड्राईव्हमधून घरोघरी पोहोचत होते. या संग्रहातूनच माझी आणि हॉलीवूड ची पक्की मैत्री झाली. त्यामुळे पायरेटेड सिनेमाच्या 80% च विरोधात. कारण जिथे पर्यायच नाही अशावेळी काय करणार?

आता राहिली गोष्ट चित्रपटगृहात सिनेमा लागला आहे तरीही घरी पायरेटेड बघणाऱ्यांची. मला हे 100% पटत नाही. एकतर निकृष्ट दर्जाची प्रत असेल तर पाहून काय करणार? आणि चांगली प्रत असली तरी तुम्ही कोणाची तरी कला फुकट खात आहात हे अतिशय चुकीचे आहे. चांगला चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघावा नाहीतर बघूच नये.

आज घडीला एकाहून एक चांगल्या स्ट्रीमिंग सेवा आहेत त्यामुळे पायरेटेड सिनेमा पाहणे म्हणजे खरेतर बुद्धीला पटत नाही.



ते 20%

काही हॉलिवूड चे सिनेमे, मालिका असतात जे पायरेटेड सोडून कुठेही उपलब्ध नसतात. किंवा अतिशय महाग असतात. अशावेळी मी बिनधास्त पायरेटेड पाहतो. या दुटप्पीपणाचा युक्तिवाद मांडायचाच असेल तर - या सिनेमांना बघून खरेतर आपण त्या दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांची लोकप्रियता वाढवत असतो. आजच्या डिजिटल युगात त्यांना फायदा होतोच. उदाहरण द्यायचे झाले तर रसेल पिटर्स या मूळ भारतीय-कॅनेडियन प्रहसनकाराचे द्यावे लागेल. तो अमेरिका - कॅनडा मध्ये शोज करायचा. पण कोणीतरी युट्युब वर याला न विचारता त्याचे शोज अपलोड केले. जगभराच्या लोकांनी तर पाहिले आणि पठ्ठ्याला त्याच्या कल्पनेपलिकडे फायदा झाला. त्याने नंतर देशोदेशी हाऊसफुल शोज केले आणि लोकप्रियता मिळवली. आता त्याचे अधिकृत युट्युब चॅनेल आहे. बऱ्याच शोजची सुरवात तो गमतीने लोकांना चोर म्हणून करतो.

"Look at you filthy downloaders" - Russel Peters
अशाच प्रकारे बरीच हॉलीवूड ची मंडळी माझ्या पिढीला पायरेटेड सिनेमांमधून भेटली. आता आमच्या पिढीला आणि पर्यायाने देशालाच चांगले दिवस आले. त्यामुळे या हॉलीवूड मंडळींचे चित्रपट, युट्युब वरचे कार्यक्रम आम्ही योग्य मोबदला देऊन पाहत आहोत. याला म्हणतात गुंतवणुकीचा परतावा.

असो.. तर अशाप्रकारे आपापली बुद्धी चालवून निर्णय घावेत. कधीकधी नियम तोडावे लागतात. कुणीतरी म्हंटलेच आहे - "(आपल्या प्रगतीसाठी) नियम तोडा, कायदा नाही."- "Break the rules, not the law"



आता थोडे स्वउदात्तिकरण

self-promotion ;)

बाजीराव मस्तानी आला होता त्यावेळी मी ऑस्ट्रिया मध्ये होतो. ट्रेलर बघून मनात नुसते "हर हर महादेव" चालू झाले. पायरेटेड सिनेमा बघायचा नाही या माझ्या नियमाला जागण्यासाठी जर्मनीच्या म्युनिकला जाण्याची तयारी चालवली होती. खर्च काही शे दोनशे युरोज आला असता. कडक हिवाळा असल्याने जास्त काही शहर पाहता पण येणार नव्हते. मग काय करणार?पाहिला पायरेटेड. आठवड्याभरात हा सिनेमा जवळच्या ग्राझ शहरामध्ये लागला. तेव्हा मग ट्रेन ने जाऊन परत पाहून आलो.



उसुलौका पक्का हु मय

हीच कथा सैराट ची. सैराट काही तिकडे प्रदर्शित झाला नाही. पण मी पुण्यात हडपसरला मॉर्निंग शो चे एक स्वस्त तिकीट बुक केले आणि तिकडे पायरेटेड बघितला. त्याबाबत मी माझ्या ब्लॉग वर लिहिले होते.



नंतर कुठल्याश्या मुलाखतीत स्वतः नागराज मंजुळेंनी गावच्या पोराटोरांना सांगितले होते की एखाद्या गावात सैराटची तिकिटे मिळत नसतील तर थिएटर बाहेर धिंगाणा घालण्याऐवजी पायरेटेड पाहा. असो.. एक तिकीट वाया गेले दुसरे काय..

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक