पाश्चात्य मालिकांचे अनोखे विश्व
August 2013 माझी ५०० जीबी पोर्टेबल हार्डडिस्क भरून गेली. ६०-७० पिक्चर, ढीगाने काढलेले फोटो, कधीतरी अभ्यास करू म्हणून टाकलेले ऑनलाईन ट्युटोरीयल्स, विडीयो लेक्चर्स, ई-बुक्स, मित्रांकडून जमवलेलं किडूकमिडूक, आणि माझ्या आवडत्या मालिकांचे ऋतू यांनी सगळी जागा सामावली. नवीन काही टाकायचे तर काय उडवू असा प्रश्न पडतो बऱ्याचदा. एकाच विषयावरची सतराशेसाठ ई-बुक्स ठेवून खरेतर मला कधीच उपयोग झाला नाही. सरळ सरळ कुणीतरी एक पुस्तक सुचवावे आणि आपण ते वाचावे हे तसे पाहता फार व्यवहार्य आहे. नाहीतर एकही वाचून होत नाही. पण ठरवून देखील आता डीलीट करत नाहीये. एखाद्या जुन्या घरात जसे मागल्या पिढ्यांचे कधीही न वापरात येणारे सामान उगीच पडून असते, तशी झालीये माझी हार्डडिस्क. तर अशी ही हार्डडिस्क मी बिनधास्त मित्रांना मागातील तशी देतो. ते बापुडे ४जीबी चा पेन ड्राईव्ह पुढे करून एखादी मालिका मागतात. एक-एक ऋतू ६-७ जीबी चा असताना ती त्यांची कसरत पाहून मला कीव येते. आणि मग मी त्यांना हार्डडिस्क देण्याचे कबूल केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपून बरे वाटते. मग काही जण खूश होऊन स्वत:हून नवीन मालिकांचे काही...