आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक

मूळलेख ( माझा मूळ इंग्रजी लेख ब्लॉग वर प्रकाशित केल्याचा दिनांक - जानेवारी २०१८) मी माझ्या आजीला (वय 85 वर्षे, पुणे) डॉ. पांडुरंग कुंभार यांच्या दवाखान्यात तिच्या अर्धांगवायूच्या उपचारासाठी घेऊन गेलो होतो. माझ्या आजीला 20 नोव्हेंबर 2016 रोजी अर्धांगवायूचा झटका आला. पहाटेच्या सुमारास तिला उजव्या हातामध्ये सुन्नपणा जाणवला आणि ती आमची उठण्याची वाट पाहत होती. तिने आम्हाला सांगितले की तिला तिचा उजवा हात अजिबात हलवता येत नाही. ती व्यवस्थित बोलू शकत होती. आम्हाला वाटले की थंडीमुळे ते तात्पुरते सुन्न झाले असेल. 4 तासांनंतरही ती हलू शकली नाही तेव्हा आम्ही तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. डॉक्टरांनी उपचार सुरू केले आणि आम्हाला सांगितले की हा अर्धांगवायूचा झटका होता आणि तिच्या उजव्या हाताचा 90% आणि उजव्या पायाचा 60-70% भाग अर्धांगवायूमुळे निश्चल झाला होता. डॉक्टरांनी नमूद केले की अशा परिस्थितीत लवकरात लवकर उपचार चालू केले तर बरे होण्याची शक्यता जास्त असते. तिला पुढील 1 आठवडा दवाखान्यात औषधे, इंजेक्शन्स आणि फिजिओथेरपी दिली गेली. तिची प्रकृती स्थिर होती पण आम्हाला काहीच सुधारणा दिसत नाही. सर्व प्रिस...