एका तेलियाने
मी मागच्याच आठवड्यात "एका तेलियाने" हे गिरीश कुबेरांचे पुस्तक वाचले. सौदी अरेबिया, व्हेनेझुएला, लिबिया, कुवेत, इराण इत्यादी तेलउत्पादक देशांचा २० व्या शतकातला संक्षिप्त इतिहास वाचायला आवडणार असेल तर तुमच्यासाठी हे चांगले पुस्तक आहे. पश्चिम आशियातल्या मागास टोळीवाल्या देशांमध्ये विसाव्या शतकातच्या सुरुवातीला खनिज तेल मिळाल्यानंतर तिथले झालेले बदल; अमेरिका, ब्रिटन, फ्रांस, सोविएट रशिया या तात्कालीन बड्या राष्ट्रांमध्ये या नवीन संपत्तीवर वर्चस्व मिळवण्यासाठी चालू असलेली रस्सीखेच; इस्राएल, पॅलेस्टिन, इजिप्त, लिबिया, सीरिया यांचा या खेळामध्ये केला गेलेला वापर, युद्ध, तह, हेरगिरी; ते तेल विकून मिळालेल्या अमर्याद संपत्तीचा उपभोग घेणारे शेख यांच्या अजब कहाण्या या पुस्तकात आहेत. पुस्तकाचा आवाका मोठा असला तरी त्यात क्लिष्टता नाही वाटली. आणि या पुस्तकाची सर्वात आवडलेली बाब म्हणजे या सर्व घटनांना एक हिरो देखील आहे. सौदी अरेबियाचा तेलमंत्री म्हणून कारकीर्द गाजवलेले झाकी यामानी हे या पुस्तकाचे नायक. अरब तेलावर पोसलेल्या पाश्चात्य विकसित देशांच्या तेल कंपन्यांना त्यांच्याच पद्धतीने वठणीव...