टाईम डायलेशन
"जर आपण कृष्णविवराच्या जवळच्या ग्रहावर राहायला असलो तर वेळ विस्तारामुळे (टाइम डायलेशन) माणसाच्या जन्माची प्रक्रिया विलंबित होईल काय?" खालील लेख Quora.com वरच्या या प्रश्नाचे उत्तरादाखल लिहिला होता. उत्तर थोडे असंबद्ध वाटू शकते पण धीर धरा. विषय कठीण आहे आणि मला उदाहरणातूनच समजला आहे. त्यामागचे गणित वगैरे माझ्या बुद्धीच्या बाहेरचे काम आहे. करोना वायरसच्या परिणामामुळे घरातच आहे. त्यामुळे "द फॉल्ट इज इन अवर स्टार्स" हा तद्दन रोमँटिक रडवेला पिच्चर पाहण्यात आला. मला रडू वगैरे आलं नाही. कारण चित्रपटातल्या प्रेमी युगलाला कँसर असला तरी एक सुखवस्तू कुटुंबात त्यांचा हा प्रेमाचा प्रवास दाखवलाय. वेदना असली तरी दुःख अगदी पराकोटीचे नव्हते. नॉर्वे, स्वीडन किंवा अमेरिकेतल्या तरुणीला कदाचित हुंदके आवरणार नाहीत. पण मला? छे. म्हणजे आपल्यासारख्या देशात जिथे कँसर बरोबर गरिबी असलेली कुटुंबे जेव्हा आपण पाहतो तेव्हा या स्टोरीमधल्या प्रेमी जोडप्याचे बरे चालले आहे अशीच भावना होते. आता दुःख ते दुःख तुमचे काय आणि माझे काय श्रीमंतांचे काय आणि गरिबांचे काय, हा तर्क योग्य वाटत नाही, ना...