एका पॅच ची गोष्ट..


P E C F D आता हे वाचा E D F C Z P, प्रत्येक क्लिक गणिक छोट्या होणाऱ्या त्या अक्षरांच्या रांगांना कसून प्रयत्न करत वाचतोय. तिथल्या बहुधा इंटर्न असलेल्या डॉक्टरने फोन उचलला. माझ्याएवढाच, किंवा माझ्यापेक्षाही लहान असलेला इंटर्न. "Ma'am, new patient, shuttlecock injury. I checked his eye pressure, it's normal. Sight 6/6. I suspect internal hemorrhage", फोन ठेवून परत माझ्याजवळ येतो, "हम्म, ठेवा हनुवटी इथे, फोरहेड टेकवा समोर. सरळ बघा." त्या प्रकाश पुंजक्याकडे बघतोय. सकाळी कोर्ट वर टंच पोरगी बघून सुखावणारा माझा डोळा, आता अस्तित्वाची परीक्षा देतोय..
च्यामारी, ऐतिहासिक नाटकाचा अंक लिहिल्यासारखं वाटतय. जाउदे, कसेही लिहिले तरी पब्लिक वस्तारे घेउनच बसलीये.

थोड्या वेळाने मोठ्या डॉक्टर आल्या. एक्सामीनेशन चेयर वर बसून, डोळे किलकिले करत वर पाहिले. करारी व्यक्तीमत्व.. आल्याआल्या कोणीतरी जाहीर केले, डॉक्टरांनी "shuttlecock injuries" या विषयावर रिसर्च पेपर पब्लिश केला होता. त्या दुखऱ्या अर्धवट बंद डोळ्यालाही विस्फारायाचा मोह झाला. चायला, लोकं असल्या दुर्मिळ विषयावर पीएचडया करतात?
पीएचडया हा शब्द पीएचडी चे बोलीभाषेतले अनेकवचन आहे. आमच्या रशियन च्या बाईंनी एकदा बोलता बोलता सांगितले की दुसऱ्या भाषेतल्या शब्दांची प्रारूपं जेव्हा एखाद्या भाषेत प्रचलित होतात तेव्हा ती भाषा खरेतर समृद्ध होत असते. हे ऐकल्यापासून, मी भाषेवर उपकार केल्यासारखे पिझ्झे, सीड्या, पीएचडया असले शब्द होलसेल मध्ये वापरत असतो. मारुती चितमपल्ली यांच्यासारखे लाखभर नाही तर किमान शंभर तरी शब्द माझ्याकडून मिळतील मराठीला..

असो, तर त्या आल्या आणि त्यांनी फाडली.. आता इथे सगळे सांगून तुम्हाला करूण रसामध्ये न्हावू घालत नाही, नाहीतर थ्री इडीयटस् मध्ये दाखवल्यासारखा माझा ब्लॉग ब्लॅक अॅड व्हाईट व्हायचा. पण मला काय माहिती, थोडी मजाच वाटली त्यावेळी. त्या रात्री नीट विचार करत पडलो तेव्हा कुठे गांभीर्य लाक्षात आले. तर त्यांनी पटापट डोळे चेक केले. आणि इंटर्न डॉक्टर, त्याला आपण पिंटू डॉक्टर म्हणू, त्याच्याशी हितगुज करून प्याच लावावा लागेल उजव्या डोळ्याला असे सांगितले. एव्हाना कोणीतरी शटलकॉक लागलेला पेशंट आलाय हि बातमी हॉस्पिटल मध्ये पसरली, आणि बाईंचा रिसर्च सब्जेक्ट आला म्हणून तीन चार इंटर्न डॉक्टर त्या इवल्याशा केबिन मध्ये जमा झाल्या. उत्साह असा की जणू कितीतरी वर्षांनी गोकुळात कृष्ण आला की काय. प्रत्येकीने ती टॉर्च वाली दुर्बिण घेवून माझ्या उजव्या डोळ्याला लावली. खचाखच फ्लॅश डोळ्यात. वाटले, असा कोणी मुन्नाभाई यावा आणि म्हणावे "ये तुम्हारा सब्जेक्ट नहि, इसको भी दर्द होता है".. पण आमची एकमात्र आशा, आमचे मुन्नाभाई मुस्तफा, त्यांच्या काल्पनिक केशसाम्भारातून हात फिरवण्यात मग्न..

पॅच तर पॅच, तेवढीच जुनी हौस तरी होईल, ही वेडी आशा तो पॅच बघूनच धुळीला मिळाली. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर लावतात तसा कापसाचा बोळा.. म्हंटले हायरे.. मोठा धीर करून मोठ्या डॉक्टरांना विचारले, "डॉक्टर, don't you have that fancy kind of eye-patch?" पलीकडून तेवढ्याच तुच्छपणे प्रतिप्रश्न.. "fancy eye-patch?", "ओहो, you want Pirate eye patch, Pirates of Caribbean??" इति पिंटू डॉक्टर. "नाही नाही.. वॅल्क्युरी मधल्या टॉम क्रुझ सारखा" हे वाक्य घशातच विरले, मोठ्या डॉक्टरने बघितलेच अशा नजरेने. "we don't have those patches", समोरून थंड उत्तर. मी आपले उगाच सावरण्यासाठी.. "I was just kidding, hehe, hehe" म्हणत गुमान तो बोळा लावून घेतला डोळ्यावर.

तर, मी केळकर हॉस्पिटल मध्ये पोहोचलो कसा? हे सगळे शनिवारी १४ ऑगस्ट ला झाले. मी, मुस्तफा, निखिल आणि त्याचा मित्र पंकज असे चारजण COEP मध्ये बॅडमिंटन खेळायला आलो होतो. इथे आणखी काही परिच्छेद लिहून तुम्हाला बोर करण्याऐवजी या घटनेचे रेकॉर्डिंगच पाहूया. कॅमेरा यथातथाच असल्याने काही डीटेल्स गळाल्या आहेत, समजून घेणे..




जसे मला लागले, तसा कोर्टवर आडवाच झालो. डोळा प्रचंड दुखत होता. आमचा दीड तास चाललेला खेळ तिथेच संपला, आणि खाली आलो. वारंवार उजव्या डोळ्याने दिसतंय का याची खात्री करत होतो. कॅंटीन मध्ये बसल्यावर प्रकरण सोपं नाही याची जाणीव झाली. इकडे निखिल म्हणे, "एका फटक्यात गार होणे, याचं भारी उदाहरण आहे हे", मनात म्हंटले कुणाला कुठल्या म्हणी कधी कळतील याचा भरवसा नाही. पंकज सॉरी, सॉरी म्हणत होता, त्याला म्हटले, "भाऊ, मी रोज ४६ किलोमीटर ट्रांस-पुणे रोड, म्हणजे हडपसर-रेसकोर्स-पुणेस्टेशन-विद्यापीठ-औंध-रहाटणी ये जा करतो, काहीही होऊ शकते, त्यामुळे तू काही वाटून घेउ नकोस. चालायचेच.." त्याला असे म्हंटले खरे, पण हे प्रकरण कुठवर चालणार याची कल्पना नव्हती.
आमचे टीम-लीड कम मित्र मुस्तफा यांच्या गाडीवर बसून तडक केळकर हॉस्पिटल गाठले. स्वागतिकेच्या जवळचा बेंच पकडून एका डोळ्यावर रुमाल धरून बसलो. मुस्तफा माझा केस पेपर काढत उभा. स्वागतिकेने, नको यार, स्वागतिका वगैरे शब्द वापरला तर कुठल्या तरी बीच रिसॉर्ट वर चेकइन करतोय का काय असे वाटते.
तर रिसेप्शनिस्ट: पेशंटचे नाव?

मुस्तफा: आशिष शेटे.
रिसेप्शनिस्ट: वय?
मुस्ताफा: (माझ्याकडे बघून) कितीयेरे? (उत्तराची वाट न बघता) २६.
मी: अर्रे...sss २५.
रिसेप्शनिस्ट गोंधळात. डेस्क जवळच्या पब्लिक मध्ये खसखस.
रिसेप्शनिस्ट: फोन नंबर?
मुस्तफा: हा.. नाईन झीरो, फोर नाईन.. (माझ्या चेहऱ्यावरचे काळजीचे भाव बघून मला इशारा करतोय..मी पण इशार्यानेच सांगितले की तू मार्केटिंग वाल्या लोकांना नाही कटवत आहेस..)
मी: अर्रे...sss
(रिसेप्शनिस्टच्या गोंधळात भर, आता चिडली..)
रिसेप्शनिस्ट: हे बघा इमर्जन्सी मध्ये आम्हाला लागू शकतो नंबर, व्यवस्थित माहिती द्या पाहू..
मग मीच सांगितला नंबर.

इकडे मला मुस्तफा आणि तिकडच्या लोकांना पाहता येत होते पण उजवा डोळा बंद असल्याने निखिलच्या बाजूने नुसताच फिदीफिदी चा आवाज. आणि मग मला लगेचच बोलावणं आलं आणि मी त्या चेकअप रूम मध्ये दाखल झालो.

डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन घेवून बाहेर पडलो आणि मुस्ताफाने मला पार घरी आणून सोडले. एका डोळ्यावर तो बोळा. दोस्ती मधले "चाहूंगा मै तुम्हे शाम सवेरे" गाणे बॅक्ग्राउंड ला वाजतंय असा भास झाला.
नंतरच्या दोन दिवस माझी वाहतूक करण्याचे काम अमोल ने केले. १५ ऑगस्ट च्या दिवशीपण पिंटू डॉक्टर हॉस्पिटलात इमर्जन्सी सेवेसाठी. त्याचे कौतुक वाटले. त्या दिवशी दोनच डॉक्टर होते. त्याने सीनिअर्स शी बोलणी करून नवी औषधे लिहून दिली.
म्हणजे या लोकांना सुट्टी नाहीच.

----


मला नेहमीच या डॉक्टर जमातीबद्दल कुतूहल मिश्रित आदर वाटतो. आणि NGO मध्ये काम करणाऱ्यांबद्दल तर जास्तच. हे लोक तुफान काम करतात. निराश मने आणि कंगाल जर्जर शरीरे बघतात, तरी यांना frustration येत नाही. कामाचा लोड असूनही कधीकधी हसताना पण दिसतात. यांना कधी "आपल्या आयुष्याचा अर्थ काय" असले फुटकळ प्रश्न पडत नाहीत का?
नाहीतर आम्ही.. दर शुक्रवारी संध्याकाळी आपापला बँक बॅलंस चेक करून रात्री शिवार मध्ये किंगफिशर (सोडा.. गैरसमज नको) रिचवण्यास तयार. आणि सोबतीला "आपल्या आयुष्याचा अर्थ काय" हा प्रश्न चघळायला. "साला ब्रेक पाहिजे", "हे काय काम आहे", "बॉस, ऑनसाईट कधी मिळणार?", "कंटाळा आला जाम राव" ही रडगाणी आहेतच.
तर त्यामुळे मला अलीकडे डॉक्टरांचा जास्तच आदर वाटायला लागलाय. आपल्या देशाची आता काही स्थिती आहे, ज्याला आपण सोयीसाठी सिस्टीम म्हणू.. आणि अराजक यांचामध्ये या समर्पित डॉक्टरांची फौज आहे.

----

या आठवड्यात बऱ्याच दिवसांनी अगदी नाईलाजाने बसमधून ट्रांस-पुणे मार्गावर प्रवास केला.. मला PMT ने प्रवास करायला आवडत नाही, कोणी म्हणेल PMT नव्हे, PMPL.. मी म्हणतो काय उजेड पडला नाव बदलून.
हा तर, मला PMT ने प्रवास करायला आवडत नाही, का..
१. या गाड्यांचे सीट मला बसता येणार नाही असे बनवले आहेत. त्या सीटमध्ये बसल्यावर मला सरळ बसता येत नाही.
पुण्यातले लोक ठराविक उंची नंतर वाढू शकत नाहीत, असा शोध PMT बनवणार्यांनी लावला होता, आणि आजही त्याच आराखड्यावर बस बनवल्या जातात.
२. बसच्या डाव्या बाजूला ठळक अक्षरात "महिलांसाठी" लिहिलेले असतानाही काही महाभाग तिथे बसलेले असतात. त्यात तरूण पब्लिक जर दिसले तर मला लैच कसेतरी वाटते.
त्यामुळे माझ्यासाठी PMT वर्ज्य.

----

आज या शटलकॉक च्या घटनेला १ आठवडा झाला. आज परत तपासून आलो. डॉक्टर म्हंटले नॉर्मल आहे. बोळा-प्याच कधीच काढलाय. ड्रॉपस् चालू. परत पंधरा दिवसांनी बोलावलंय. आज अमोलने फोन केला, तेव्हा परत "चाहूंगा मै तुम्हे शाम सवेरे" गाणे बॅक्ग्राउंड ला वाजतंय असा भास झाला. या घटनेने काही धडे दिलेत, सगळेच लिहायचे तर नवीन पोस्ट टाकावा लागेल, पण आपण आयुष्य फार गृहीत धरतो, याची जाणीव झाली, ती किती दिवस राहतीये हि गोष्ट अलाहिदा.. मुस्तफा, अमोल आणि निखिल यासारखे मित्र कमावणे पण एक अचिवमेंटच.
बाकी परत लिहितो, असले TP पोस्ट टाकून लेखकू व्हायचे भिकारडोहाळे लागणार नाहीत याची खात्री आहे, कारण आपली ग्यांग इंसेप्शन वगेरे करायच्या भानगडीत पडत नाही, डायरेक्ट लाथ मारून स्वप्नातून बाहेर काढते हे माहितीये मला.. :)

टिप्पण्या

  1. बास बास... कोणी यावर ब्लॉग लिहील असं स्वप्नातही वाटणं अशक्य गोष्ट होती! असो... तसं चांगलं लिहिलं आहे पोरानं... ;) पण व्हिडियो मात्र खरंच एक नंबर !! तोडच नाही त्याला! एक्स्प्रेशन्स सकट... खरंच "लय भारी" .... (मित्रांनो... "फ़ायटर" नंतर एक "ब्रेव्ह सोल" मिळाला आहे आपल्याला बरं का... B-) )... आणि आशिष, कॅन्टीनमधे बोलतांना त्याच दिवशी तू तूझा ’कॉपीराईट’ असलेला फ़ंडा सांगितला होतास - "we live in the world of probability" (जस्ट तूला आठवण करून दिली! ;-) ) आणि येवढं सगळं लिहिलंच आहेस तर हे पण लिहायचं होतंस, कि खरं तर हॉस्पिटलमधे तू ’पायरेट’ वाल्या पॅचसाठीच गेला होतास! हाहा.. आणि हो.. वय २६ सांगितल्यावर आशिषची जी काही चिडचिड झाली होती ती खरंच पाहण्यासारखी होती! ("बच्चा है बच्चा" - 'अवतार' मधून साभार.) बाकी हे "ट्रांस" काय ठिकाण आहे ?

    उत्तर द्याहटवा
  2. Nikhil.. Thanks yaar.. nivant reply karato ratri, attach OS install kelyamule Transliteration software nahiye.
    Till then.. for "Trans"
    http://en.wikipedia.org/wiki/Trans-Siberian_Railway

    उत्तर द्याहटवा
  3. आशिष शेटे ह्यांनी डोळा दुखत असतांना देखील हा ब्लॉग लिहिला ह्या बद्दल त्यांचे खरच कौतुक करण्या सारखे आहे. बाकी निखिल म्हणतो तसा विदेओ एक नंबर आहे. मुस्तफा ची केशभूषा खतरनाक जमली आहे. शेटे पाटील , तुम्ही Animation artist म्हणून पण काम करू शकता. म्हणजे उद्या तुम्हाला कोड फोड करून कंटाळा आला तर Garage च्या जोडीला हा पण एक जोडधंदा आहे. पोरगा लैच versatile होत चालला आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. खुप मस्त लिहलय. एकदम फटॅक. असा मी असामी वाचताना मी जशी हसले होते तशिच हसले मी पुन्हा. मस्त वाटल वाचुन. मी अवधुत गुप्ते असते तर अजुन छान comments देवु शकले असते. अफलतुन, जिंकलस गड्या, मजा आली वाचुन,फाडु, धमाल केलीस etc etc. keep it up.

    उत्तर द्याहटवा
  5. Thanks a million Vahini.. घरी कुणीतरी वाचतं म्हणायचं माझा ब्लॉग, नाहीतरी घरी कि मुर्गी, नाही.. मुर्गा दाल बराबर अशी गत :)

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्रायासाठी अनेक आभार!

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक