द ब्रीज ऑन द रिवर क्वाय: आत्मघातकी वेडाची कथा
ह्या पिक्चर बद्दल लिहिणे हि मोठीच जबाबदारी आहे, मोठे समीक्षकच करू जाणे. पण आधीच कुठेतरी म्हटल्याप्रमाणे, "दिवसा प्रचंड सूर्य तळपतोय म्हणून काजव्याने आपली चमकवणे सोडून द्यावे का?"असो..
या पिच्चर चे सिनेमाच्या इतिहासात एक स्वतंत्र स्थान आहे. निर्मितीमूल्य, मनोहारी छायाचित्रण, बांधून ठेवणारी कथा, विषयाची तटस्थ आणि सगळे पैलू तितक्याच ताकदीने मांडणारी हाताळणी, तर्क आणि अभिनय या सगळ्या आघाड्यांवर हा सिनेमा मापदंड ठरलाय.
आमच्या बँगलोर [१] मध्ये मी राहायचो तिथे, इंटरनेट वाल्याने पिक्चर, सिरीज, गेम्स, सोफ्टवेअर आणि बरेच 'किडूक मिडूक' याचा खंडीभर मोठा संचय करून ठेवला होता. त्याच्यात नाही नाही ते सिनेमे मिळायचे. असेच एका आळसावलेल्या सप्ताहांतात खिडकीतून बाहेरच्या टळटळीत दुपारीकडे बघत असता मला या सिनेमाची आठवण झाली. लागलीच या संचयातून तो काढला आणि बघितला. त्याच आठवड्यात २-३ दा बघितला. याला जेवढा निरखून बघाल तेवढे नवे पैलू दिसतात. अगदी इंसेप्षण सारखे लगेच डोके भंजावून सोडणारा नाहीये, पण महिनाभर डोक्यात राहतो.
ब्रीज ऑन रिवर क्वाय, हा वरवर युद्धपट असला तरी त्यात युद्धनिती, सैनिकांचे आक्रमण, रक्तप्रपात, वीरश्री, जय, पराजय यांना फारसे महत्व नाही. उलट सिनेमाची सुरुवातच एका शरणागती पत्करलेल्या सैनिकांच्या तुकडीला दाखवून होते. त्यांच्या चेहऱ्यावरील पराभूत भाव, पावलांची विस्कटलेली लय, त्यांचे फाटके कर्दमलेले कपडे, उसवलेले बूट आणि फार मोठा प्रवास केल्यावर आलेला शीणवटा याला टिपत सिनेमा सुरु होतो. हे सैनिक आहेत सिंगापूर चा पाडाव झाल्यावर जपानपुढे शरणागत झालेले ब्रिटीश. त्यांना सिंगापूरहून जपान्यांनी थायलंड मध्ये आणलंय. जपानच्या बर्मा आक्रमणाची पूर्वतयारी म्हणून थायलंड ते यांगून रेल्वे बांधण्यासाठी त्यांना राब राब राबवतायेत. असंख्य युद्धकैदी कुपोषणाने, रोगामुळे मेलेत आणि त्यांना त्याच रेल्वे रुळांच्या अवतीभवती गाडले जातंय. या महत्वाकांक्षी आणि निर्दयी प्रकल्पाचा महत्वाचा दुवा आहे तो क्वाय नदीवर बांधायचा असलेला पूल. हे त्यातल्या त्यात नव्या दमाचे सिंगापूरचे युद्धकैदी त्या कामासाठी वापरले जाणारेत.
इथून कथेत ४ मुख्य पात्रे आहेत.
१. ले.कर्नल निकोल्सन - ब्रिटीश सैनिकांचे अधिकारी.
२. कर्नल सायटो - युद्धबंदी कॅम्पचे कमांडंट.
३. मेजर क्लिप्टन - ब्रिटीश सैन्याचे डॉक्टर.
४. कमांडर/ सीमन शीयर्स - युद्धबंदी कॅम्प मधले एकमेव अमेरिकन.
ही सिंगापूरची तुकडी कॅम्पमध्ये आल्याआल्या कर्नल सायटो त्यांना आठवून करून देतो कि ते आता युद्धकैदी असून जपान्यांनी दिलेली कामे केली तरच जगण्याची आशा ठेवू शकतात.
ब्रिटीश अधिकाऱ्यांना त्यांच्या सैनिकांबरोबर काम करावे लागेल हे ऐकताच कर्नल निकोल्सन पुढे येतो आणि सायटो च्या हातात जिनिवा कराराची प्रत ठेवून त्याला सांगतो की या करारान्वये सैन्याधीकार्यांना अंगमेहनतीच्या कामाला लावेणे योग्य नाही. परंतु सायटो नुसताच ती प्रत फाडून फेकत नाही तर निकोल्सन च्या मुस्कटात लगावून त्याला आणि इतर अधिकाऱ्यांना दिवसभर उन्हात उभे करून ठेवतो. २ दिवस असा छळ करूनही निकोल्सन नमत नाही. इकडे ब्रिटीश सैनिक आपापल्या परीने कामात दिरंगाई करून त्या पुलाची वाट लावण्यात गुंतलेले असतात.
पुलाची प्रगती अपेक्षेपेक्षा निम्म्याहून कमी झालीये असे पाहून सायटो कर्नल निकोल्सनला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करून पाहतो. परंतू जिनिवा कराराप्रमाणे जोपर्यंत वागणूक मिळत नाही तोपर्यंत सहकार्य करणार नाही असे निक्षून सांगून निकोल्सन अडून राहतो. शेवटी पूल जर वेळेत पूर्ण झाला नाही तर तोंड दाखवायला जागा रहाणार नाही आणि आत्महत्या करवी लागेल या विचाराने सायटो नमते घेतो आणि निकोल्सन आणि इतर ब्रिटीश अधिकार्यांच्या मागण्या मान्य करतो.
या वाटाघाटीत यश आल्याने हुरूप आलेला निकोल्सन त्याला पूल पूर्ण करण्याचे आश्वासन देतो[२]. आणि जोमाने आपल्या सहकाऱ्यांसहित कामाला लागतो. प्रथम आपल्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून कामाचा आढावा घेतो आणि सायटो ला पटवून देतो की पुलाची जागा चुकलीये. भारतात अशा कामांचा अनुभव असलेले त्याचे अधिकारी काही दिवसातच लक्षणीय प्रगती दाखवत नव्या जागी पूल उभा करायला लागतात. एकीकडे सायटो त्या पुलाच्या कामाकडे बघून समाधानी असतो तर त्याच वेळी या ब्रिटीश युद्धकैद्यांनी अशा प्रकारे जपान्यांची नाचक्की केलीये याचाही त्याला खेद असतो.
हे पुलाचे काम पाहून सैनिकांचा डॉक्टर असलेला क्लिप्टन, कर्नल निकोल्सनवर शत्रूशी हातमिळवणी केल्याचा आरोप करतो. त्याला उत्तर म्हणून निकोल्सन सांगतो की युद्धकैद्यांना कोणत्याही कामाला नाही म्हणायची तरतूद नाही, पण आपल्या सैनिकांनी हा पूल शत्रूपेक्षा चांगला बनवावा का या क्लिप्टन च्या प्रश्नावर कर्नल निकोल्सन त्याला सांगतो की, ब्रिटीश सैनिक पराभूत असूनही स्वत:चा आत्मसम्मान राखतायेत. युद्धानंतरही जे लोक हा सेतू वापरतील ते ब्रिटीश सैनिकांचे नाव काढतील.
अशा घडामोडी चालू असतांना अमेरिकन नौसैनिक शीयर्स तिथून पळ काढतो आणि सिलोन (श्रीलंका) मध्ये ब्रिटीश तळावर पोहोचतो. तिथे आराम करत असताना एके दिवशी ब्रिटीश त्याच्या मदतीने ह्या पुलाला उद्ध्वस्त करायची योजना आखतात. सुरुवातीला नाही म्हणणारा शीयर्स कारवाईच्या भीतेने या मोहिमेसाठी तयार होतो आणि ही कमांडोंची तुकडी मजल दरमजल करत पुलाच्या जागेपर्यंत पोहोचते.
पूल पूर्ण झाल्यावर त्याच्यावरून जपानी अधिकारी आणि सैनिकांनी भरलेली रेल्वे जाणार असल्याचा सुगावा मित्रांना लागतो आणि ते या कमांडोंना पूल रेल्वे त्यावरून जायच्या वेळीच उडवण्याची सूचना देतात, जेणेकरून शत्रुपक्षाची जास्तीत जास्त हानी होईल. शीयर्स आणि आणखी २ ब्रिटीश कमांडो आदल्या रात्री जपानी गार्ड्स ची नजर चुकवून पुलाखाली विस्फोटक पेरतात आणि दुसऱ्या दिवसाची वाट पाहत बसतात. दुसऱ्या दिवशी दुर्दैवाने नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी होते आणि डेटोनेटर्स ला जोडलेल्या वायर्स उघड्या पडतात. निकोल्सन आणि सायटो पुलावरून पाणी करत असताना निकोल्सन ची नजर त्या उघड्या पडलेल्या वायर्स वर पडते आणि तो सायटो बरोबर कळ दाबण्यास तयार असलेल्या कमांडोकडे निघतो. इथे अतिशय उत्कट सिक्वेन्स आहे. आता निकोल्सन काय करणार?
झपाटल्याप्रमाणे मेहनत घेवून सैनिकांनी बनवलेला तो पूल क्षणात उडवून लावण्यात येतोय हे पाहिल्यावर तो वेड्याप्रमाणे प्रतिकार करतो. शीयर्स आणि दुसरा तरूण कमांडो जॉयस विरोध करत असतानाही जपानी सैनिकांना आरडओरड करून निकोल्सन तिथे बोलावतो आणि जवळच मोर्टारचा स्फोट झाल्यामुळे भानावर आल्यासारखे त्या मृत दोस्तांच्या कमांडोंना बघत डेटोनेटर वर कोसळतो. त्याच वेळी ती रेल्वे पुलावर प्रवेश करते आणि दैवयोगाने अगदी ठरल्याप्रमाणे तो पूल गाडीसह नदीत कोसळतो.
या सर्व नाट्याचा मूक साक्षीदार- डॉक्टर क्लिप्टन, फ़क़्त "madness! madness!" करत तो विनाश पाहत उभा असताना कॅमेरा वर वर जात सिनेमा संपतो.
सिनेमा पाहून पहिली भावना आली ती त्याच्या भव्यतेची. विकी सांगते त्याप्रमाणे शूटिंग श्रीलंकेत झालीये आणि खराखुरा कोट्यावधी रुपयांचा पूल बांधून तो उडवण्यात आला.
या सिनेमाला १९५७ सालचे ७ ऑस्कर मिळालेत.
सिनेमा पाहून काही प्रश्न पडतात. निकोल्सन चे वागणे व्यवहार्य होते का? हरलेल्या सैनिकांचा आत्मसम्मान परत मिळवून देणे आणि महत्वाचे म्हणजे त्यांना जिवंत ठेवणे यात तो नक्कीच यशस्वी झाला. पण एखाद्या गोष्टीबद्दल किती ऑबसेशन असावे याला मर्यादा नाहीच. त्याचे त्या पुलावचे हे प्रेम, देशप्रेम आणि कर्तव्याच्या पुढे कधी गेले हे त्याचे त्यालाच कळले नाही. मग अशा वेडेपणाला काय म्हणावे?
There is a fine line between genius and insanity असे कुणीतरी म्हटलंय. मग ही रेखा ओलांडणे किंवा न ओलांडणे हे दैवाजातच नाहीका?
गाड्यांच्या मागे जसे लिहिलेले असते तसे "नादच खुळा"!
-*-
१. 'आपले पुणे' की 'आमचे बँगलोर' हे माझ्या मूडवर असते. एखादी PMT ची बस बघितली तरी 'आमचे बँगलोर' म्हणायला पुरेशी असते. (राज ठाकरे मागच्या आठवड्याच्या सभेत म्हणाले तसे, "PMT ची बस च्यायला जवळून गेली तरी ग्यांग्रीन होईल"). पण मग सकाळी (आणि रात्री) आंघोळ करताना ते बँगलोरचे केसगाळू पाणी आठवून 'आपले पुणे सर्वात बेष्ट' हे पटते.२. इथे आपल्या सलमानची वाँटेड मधली लाईन आठवते - "एक बार जो मैने कमिटमेंट करदी, तो मै अपने आप कि भी नही सुनता"
३. ही ट्यून या सिनेमाने अमर केली असली तरी दुसऱ्या महायुद्धापासून ती प्रचलीत होती. दोस्त राष्ट्रांचे सैनिक त्यावर विचित्र बडबडगीते म्हणायचे म्हणे.. त्यातला सर्वात प्रसिद्ध आणि माझा आवडता वर्जन म्हणजे-
Hitler has only got one ball,
Göring has two but very small,
Himmler is somewhat sim'lar,
But poor Goebbels has no balls at all.
कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान. :DGöring has two but very small,
Himmler is somewhat sim'lar,
But poor Goebbels has no balls at all.
chan ahe patil. amchyakade takla ahe ka ha cinema?
उत्तर द्याहटवाHard disc gheun yeto, ajun kaay kaay ahe ?
उत्तर द्याहटवा