तुझे सब है पता..




नियती
आपल्यापुढे कुठले ताट मांडून ठेवेन सांगता येत नाही. आज ऊन उद्या पाउस (पुणे वेधशाळेच्या हवाल्याने), आज राम-'अवतार' उद्या रा-वण (SRK च्या कृपेने).. चालायचेच. असे कितीतरी चढउतार पहिले असतील.. बऱ्याच जणांनी. आमच्या आयुष्यात मात्र असले काही नाट्य होत नाही. आमचे जगणे गेले ४-५ वर्षे कीबोर्डचा (कॉम्प्युटरच्या) नाद करण्यात चालले आणि सॅम काकांच्या कृपेने आणखी किती वर्षे जाणार ते त्यांनाच माहिती. उजव्या हाताचा अंगठा पंजाला जिथे मिळतो तिथे दुखायला लागलंय. म्हंजे हाताला विकार येईपर्यंत कुणी कीबोर्ड बडवू शकते का? या माझ्या बालपणीच्या शंकेला प्रात्यक्षिक देवून उत्तर देण्यात आलय.

मागच्या आठवड्यात kudos [१] मिळाले. हे kudos म्हंजे आमच्या कंपनीमधले दर्जा कामासाठी देण्यात येणारे सर्वात कनिष्ठ दर्जाचे पारितोषिक आहे. कंपनीतल्या जवळ जवळ ८० टक्के लोकांना मिळते. हे अवार्ड मिळाले सांगितले, तर हसतात.. आणि नाही सांगितले तर "च्यायला, kudos तर मिळालाय पण अकड जशी चम्पुची" हे पण ऐकवतात. ('चॅम्प' हे आणखी एक अवार्ड. kudos "भोकरवाडीची आशा" पुरस्कार असेल तर 'चॅम्प' हे "भोकरवाडी भूषण" पुरस्कारासारखे.) ज्यांना मिळते ते "मिळाले एकदाचे.. आता नेक्स्ट लेवल" म्हणून बरे वाटते, आणि न मिळालेल्यांना "हे काय कुणालाही मिळते" असा विचार करून.

तर, नियतीचे ताट..
आज आईचा, म्हंजे ममीचा (भावेस्कूल, लिहिताना चुकल्या-चुकल्यासारखे.. तेच ते) ऑफिसमधून निघतानाच फोन आला. म्हणे मासे केलेत. आईंग.. मासे? आणि आमच्या घरात?. नाही म्हंजे हरकत नाही, पण मासे हा प्रकार चवीने खाणाऱ्यामधले आम्ही नाही. कधीतरी वर्षातून एकदा हा प्रकार बऱ्याच वर्षांपूर्वी आई करायची, पण भांड्यांना वास येतो म्हणून ते पण मोठ्या नावडीने. मग आज मासे कसेकाय एकदम? "ओके, अच्छा" म्हटले आणि जास्त विचार न करता गप् पडलो. दीड तासांनी घरी पोहोचल्यावर कळले कि आईने कुठलेतरी पाककृतीचे पुस्तक आणून, तिच्या मैत्रिणीच्या मदतीने मासे विकत घेवून आमच्या मस्यपक्वानाची सोय केली होती. तळलेले मासे आणि कालवण. तो सगळा पसारा समोर मांडून एकदा काय घास घेतला.. अहाहा.. नियतीचे ताट इतके चमचमीत? स्वर्ग, स्वर्ग म्हणतात तो हाच कि काय बाप्पा..


-*-

१. kudos चा उच्चार कुडोस करायचा क्युडॉज् करायचा कि आणखी काही.. इथून सुरुवात असल्याने तूर्तास आपापल्या चवीनुसार करावा.

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक