जब तक है जान-समीक्षेचे समीक्षण

मायबोली वरचे रसप यांचे जब तक है जान चे परीक्षण नेटावरती जोमाने फिरत आहे. अतिशय सणसणीत शैलीत शेरूक (हा शब्द तिथेच पहिल्यांदा वाचला आणि जाम हसलो) चा समाचार घेतलाय तिथे. पण त्याने शेरूक् आणि कंपनी - म्हणजे कारण जोहर, फराह खान यांना वाईट वाटायचे काम नाही. कारण हे समीक्षण वाचल्यावर हा पिच्चर चुकूनपण न पाहणारा मी, सहकुटुंब तो बघायला गेलो. आणि या समीक्षेने कुतूहल चाळवलय असे म्हणणारे पण भेटले.
रसप ने म्हटल्याप्रमाणे छायाचित्रण नेत्रसुखद आहे. या एका गोष्टीचं भांडवल करून मी माझ्या मनाला समजावलं आणि निघालो. खरंतर अनुष्का शर्माला पोस्टरवर बघूनच मी मनाच्या मागे लागलो होतो.. अरे प्लीज मला बघुदेरे हा पिच्चर!
समीक्षेचे समीक्षण म्हणजे भिक्षुकाच्या घरी माधुकरी मागण्यासारखे. पण असो.. फर्स्ट हँड काय सेकंड हँड काय भीक ती भीक.

खराडी मध्ये ढीग मॉल चालू झालेत आणि मल्टिप्लेक्स पण. त्यात ते नवीन बॉलीवूड मल्टीप्लेक्स शोधण्यात उशीर झाला. तोवर तो अनुष्काचा बिकिनी सीन होवून गेलेला, फ्लॅशबॅक चालू झालेला, शेरूक लंडन च्या रस्त्यावर गाणं म्हणत होता. हळहळत आई आणि मावशीला सीट शोधून दिल्या. त्यांना चित्रपटाची जुजबी माहिती दिली. पुढे ज्याचं त्याचं नशीब.

सर्वात जास्त उत्कंठा होती ती "भाजी निवडल्यासारखा तारा वेचून, तोडून, उपटून बॉम्ब निकामी करतो" या दृश्याची. पण सवयीमुळे पहिले २० मिनिटं गेली आणि पुढची भाजी इंटरवल नंतरच दिसली. आता रसपंनी वाईट गोष्टी सांगितल्याच आहेत त्यामुळे त्या सोडून मी काही जमेच्या बाजू सांगतो. नाही शाहरुक प्रेमी नाही. पण मला त्याचा तिरस्कारही नाही.

ज्या प्रकारे मीरा (कतरीना) च्या भाबड्या शपथांची खिल्ली उडवण्यात आलीये, पिक्चर बघितल्यावर तरी त्यामागचे तर्क एवेढे टाकाऊ वाटत नाहीत. असतात काही लोक श्रद्धाळू. आपल्याकडे 'नवस बोलणे' हा खूप कॉमन प्रकार आहे. साधं बघा.. भारत मॅच हरेल म्हणून टीवीवर  मॅच टाळणारे लोक आहेत. आपल्या लाडक्या मंगेशकर आजी तर तेंडूलकर शतकावर असताना बघत नाहीत. त्यांचे देव गमबूट आणि रेनकोट घालूनच बसलेले असतात.. न जाणो आजी कधी पाण्यात ठेवतील. त्यामुळे हा भाग पचायला कठीण का जावा हे कळत नाही.
मी तर म्हणतो की मध्यांतरापूर्वीचा लंडन मधला भाग हा नावं ठेवावी असा नाही. समर (शारुख) आणि मीरा(कतरीना) चे फुलत जाणारे प्रेम, तिची 'प्यार आणि फर्ज' मधली कोंडी, तिची नवस बोलण्याची सवय, त्यामागचा तिचा तर्क, शाहरुख चे तिला समजून घेणे, नीतू सिंग आणि  कतरीना चा संवाद (जो खुद खुश न हो, वोह दुसरोको खुशी नही दे सकता वगैरे), जमून आलेत. च्यायला त्या टनेल च्या सीन मध्ये कॅट काय भन्नाट नाचलिये.. मिनिटभर मी अनुष्काला पाहायला आलोय हे विसरलो. सर्वात प्रगल्भ प्रकार म्हणजे, मीरा जेव्हा समरला तिच्या नवसापायी लंडन सोडायला सांगते, तेव्हा इमोश्णल होऊन तो तिची मनधरणी करत बसत नाही. कारण तिचा या गोष्टीवर विश्वास असेपर्यंत ती जरी त्याची झाली तरी प्रत्येक क्षण भीत भीत जगेन अशी समरची आणि आपली तोपर्यंत खात्री झालेली असते. कुडोज.

इथपर्यंत सर्वकाही ठीक. जसा हा आर्मीमेध्ये येतो.. तसा पिक्चर घसरतो. पिच्चरमध्ये कॉमेडी नाही त्याची कसर त्यांनी आर्मीच्या दृश्यांची बालिश हाताळणी करून काढलीये. बॉलीवूड चे सिनेमे रिसर्च मध्ये कमी पडतात. थोडा आळशीपणा कमी करून चांगला अभ्यास करून दृश्ये तयार केली तर बिघडते कुठे? पण त्यातही बॉलीवूडकरांचा किती दोष आहे माहीत नाही. आपल्याला साध्या चिम्पांट आय.टी. पार्क मध्ये फोटो काढून देत नाहीत, तर आर्मी यांच्यासाठी त्यांचे लोखंडी  दार किलीकिले करेल का हा प्रश्नच आहे. त्यामुळे यांना हवी ती माहिती होणार तरी कुठून? खरेतर सशस्त्र सेनांनी अशा सिनेमांकडे एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. आधीच ऑफिसर्स ची कमी असताना शेरूकला त्या तगड्या हँड्सम युनिफॉर्म मध्ये बघून मुला-मुलींना सेनेची आवड निर्माण होऊ शकते. ऋत्विक चा 'लक्ष्य' बघून प्रेरित झालेल्या अमोलचा भावाने पहिल्याच प्रयत्नात ओ.टी.ए.त झेंडा रोवला. इन्स्पायर तर मी पण झालो होतो हो.. पण नाही झालो ऑफिसर. हे आर्मीचे सुदैव की माझे दुर्दैव.. तुका म्हणे असो.

बॉम्ब निकामी करण्याची काही दृश्ये तर जेरेमी रेनर च्या 'हर्ट लॉकर' जशीच्या तशी उचललीयेत. यश चोप्रांकडून तरी अशी अपेक्षा नव्हती. लडाख मध्ये एवढे बॉम्ब पेरत नसावेत. त्याऐवजी हिरोला भारतीय शान्तिसेनेत ठेवून एखाद्या आफ्रिकन देशात पाठवले असते तर जास्त वास्तविक वाटले असते. पण एवढा रिसर्च कोण करणार? शिवाय अनुष्काला हाफ च्या हाफ चड्डीवर काश्मिरात नाचवायचे हा दिग्दर्शकाचा प्लॅन हिरोला आर्मीत घालायचे याच्या आधी ठरला असेल.

गाणी आणि पार्श्वसंगीत-
रसपंशी ११० टक्के सहमत. बराच बोलबाला केलेले  छल्ला गाणे म्हणजे छळ आहे. "जिया रे" या गाण्यामुळे हा रेहमान असावा अशी पुसटशी शंका येते. बाकी गाणी कुणा हव्श्या नवश्या ने संगीतबद्ध(?) केलीयेत असे वाटते. गुलझार मला समजत नाही. ते आणि रेहमान हे कॉम्बिनेशन माझ्यातरी बुद्धीपलीकडे आहे, त्यामुळे न बोलणे श्रेष्ठ.
पार्श्वसंगीत चांगले आहे.

मावशीने तब्बल ३२ वर्षानंतर एखादा सिनेमा थियेटर मध्ये पहिला हे ऐकून कसेतरीच वाटले. मी तिला फार आधीच न्यायला हवे होते.
ममीला अनुष्का शर्मा माहीत नाही. पण ती म्हणे कि "मला फक्त त्या रिपोर्टर (अनुष्का) चे काम आवडले. छानच अभिनय केलाय तिने." हे ऐकून माझा उर का भरून यावा हे एक कोडेच. असो.

तर  अगदीच कट्टर शाहरुख तिरस्कर्ते असाल तर नका बघू मग काय. पण इतर तमाम बिनडोक बॉलीवूड पटांच्या तराजूत या सिनेमाला तोलणे म्हणजे यश चोप्रांवर अन्याय करण्यासारखे. म्हणून सरसकट उडवण्यापूर्वी जराSS सांभाळून घ्या. :)


टिप्पण्या

  1. नमस्कार आशीष!

    'समीक्षेचे समीक्षण' ह्याहून मोठी शाबासकी मला मिळू शकलीच नसती! त्यासाठी आपले मन:पूर्वक आभार !

    मला शाहरुख अत्यंत इरिटेट करतो हे खरं आहे. पण त्याचं प्रतिबिंब माझ्या परीक्षणात यावं हा माझा पराभव मी मान्य करतो.. ह्याची कारणमीमांसा देत नाही.. पण सिनेमा पाहिल्यावर मला शाहरुख, दोघे चोप्रे, रहमान आणि गुलजार ह्या सर्वांचाच सारखाच संताप आला होता.. आ.चो. ला काही बोलावं, इतका तो 'प्रॉमिसिंग' नाहीच.. यश चोप्रांबाबत लिहिताना त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे आवरावं लागलं आणि रहमान व गुलजार आजच्या घडीला सर्वोत्कृष्ट आहेत त्यामुळे तिथेही माझा जोर चालेना ! उरला बिच्चारा शा.खा.. निघाली सगळी भडास !

    असो ! तुमचे परीक्षण आवडले.. संवादात्मक शैलीत लिहिण्याची पद्धत खूपच छान आहे. मी तुमचे परीक्षण वाचून त्यातून काही शिकलो तर 'चोरले' असे म्हणणार नाही ना ?

    धन्यवाद !!

    ....रसप....

    उत्तर द्याहटवा
  2. रणजीत,
    तुमच्या प्रतिक्रियेसाठी अनेक आभार.
    कदाचित मी तुमचे परीक्षण न वाचता हा सिनेमा पहिला असता, तर या याची एवढी पाठराखण केली नसती. पण काय माहिती, अगदी अचकट सिनेमांची पण खिल्ली उडवताना जरा संकोच वाटतो आता.
    मागे माझ्या मित्रांबरोबर असम-अरुणाचल ला गेलो होतो तेव्हा जायच्या दिवासागोदर ते पुण्यात परत पोहोचेपर्यंत सगळे प्रसंग शूट केले. उद्देश असा की आमच्या या ट्रीप ची एक डॉक्युमेंट्री सारखे काहीतरी बनवावे. पण एवढे फुटेज संपादित कसे करावे आणि काय टाकावे काय नाही, परत महत्वाचे प्रसंग शूट न करता भलतेच फुटेज जास्त अशा अडचणी दिसल्या.
    त्यामुळे आमची डॉक्युमेंट्री नाही झाली तरी एक गोष्ट लक्षात आली की सिनेमा हे तंत्र अवघड असून जे कोणी ते थोड्याफारतरी परिणामकपणे वापरतायेत ते अगदीच सोमेगोमे नसावेत.

    याचा अर्थ असा नाही मी टीका करतच नाही. पण बॉलीवूड मध्ये यापेक्षाही भयानक सिनेमे अगदी भल्या भल्या दिग्दर्शकांनी आणि मातब्बर कलाकारांचं मातेरं करून काढलेले आहेत. (उ.दा. मेला, गोलमाल-३, चांदणी चौक टू चायना, तीस मार खान, हाउसफुल इ. इ. हे सिनेमे मला पैसे देवून पण कुणी दाखवले तरी पाहणार नाही इतके बिनडोक आहेत) जब तक है जान मला भाबडा वाटला पण फसवणूक केल्यासारखा नाही वाटला. त्यामुळे त्याचे वकीलपत्र घेतले. :)

    रमेश,
    उत्तेजन देणारी प्रतिक्रिया बघून आनंद वाटतो. खूप खूप आभार.

    उत्तर द्याहटवा
  3. आज पुन्हा एकदा वाचले. खरं तर परवा बायकोशी बोलताना 'रहमान+गुलजार' ह्या कॉम्बिनेशनचा उल्लेख आला होता आणि तेव्हाच तुमचा हा लेख आठवला होता. आत्ता वेळ मिळाला, लगेच वाचला !
    मस्त लिहिता तुम्ही ! व्वाह ! पुन्हा एकदा तीच मजा आली !

    धन्यवाद !

    ....रसप....

    उत्तर द्याहटवा
  4. रणजीत,
    तुमची प्रतिक्रिया पाहून फार आनंद वाटला. खूप खूप आभार!
    आशिष.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्रायासाठी अनेक आभार!

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक