पाश्चात्य मालिकांचे अनोखे विश्व - २
भाग १ लिहून काही वर्षे झाली. त्यानंतर पाहिलेल्या या मालिका. (प्रथम संस्करण १२-११-२०१७)
वेस्टवर्ल्ड
२०१६ मध्ये एचबीओ वर ही मालिका सुरु झाली. प्रत्येक सीझन मध्ये १० भाग असलेल्या या मालिकेचे आतापर्यंत २ सीझन झाले आहेत.
तर काय आहे वेस्टवर्ल्ड?
वेस्ट वर्ल्ड हे भविष्यातले एक थीम पार्क आहे. हजारो एकर मध्ये इथे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातली दक्षिण-पश्चिम अमेरिका उभी केलीये. या थीम पार्क मधली पात्रे खरी खुरी माणसे नसून अतिप्रगत रोबॉट्स आहेत. या यंत्रमानवांना असे काही बनवण्यात आलय की ते हुबेहूब माणसांसारखी झालीयेत.
त्यांना वेदना होतात, आनंद होतो, झोप येते, ते स्वप्न पाहतात, त्यांना तहान भूक लागते, वार केला तर ते मरतात देखील. त्यात कुणी सैनिक आहेत, कुणी काऊबॉय, कुणी खुनी दरोडेखोर तर कुणी नगर रक्षक. कुणी वेश्या आहेत तर कुणी चांगल्या घरच्या सुसंस्कृत मुली. माणसे तर सोडाच साप, घोडे, कुत्रे हे प्राणी देखील यंत्रच. या सर्वांच्या अस्तित्वाचे एकच कारण - त्या पार्क मध्ये येणाऱ्या पर्यटकांचे मनोरंजन करणे.
या यंत्रमानवांना स्वतः विचार करण्याची निर्णय घेण्याची मुभा आहे. पर्यटकांना जिवंत अनुभव मिळण्यासाठी केलेली ती एक युक्ती आहे. पण सर्व यंत्रमानवांच्या प्रोग्राम मध्ये त्यांना स्वत:ची अशी एक आंतरिक ओढ (Core Drive) सेट करून दिलेली आहे. त्यामुळे ते जो काही निर्णय घेतील, त्यात फार काही मोठा बदल घडण्याची शक्यता नाहीच. आणि त्यामुळेच, या थीम पार्क च्या बाहेर त्यांचे अस्तित्व नाहीये.
पर्यटक हजारो डॉलर मोजून इथे येतात, या पात्राभोवती रचलेल्या एखाद्या कथासूत्राचा भाग होतात. खून, दरोडे, मार्यामार्या, द्वंद, संभोग, युद्ध करतात. स्वप्नातही कल्पना न केलेले आयुष्य मोजक्या दिवसांकरता जगतात. या पर्यटकांना 'गेस्ट' तर यंत्रमानव पात्रांना 'होस्ट' असे स्पष्ट विभाजन आहे. 'होस्ट' कधी गेस्ट ला इजा करू शकत नाहीत आणि या नियमाला पर्याय नाही. पण गेस्ट या यंत्रमानवांना कितीही प्रमाणात इजा पोचवू शकतात. त्यातूनच या पर्यटकांच्या कोणत्याही, मग त्या विकृत का असेना, अशा इच्छा तृप्त करण्याची व्यवस्था केली गेलीये.
कथासूत्रादरम्यान मारले गेलेल्या यांत्रामानवांना परत फॉरम्याट करून पार्क मध्ये सोडले जाते आहे. तेच आयुष्य तेच कथासूत्र जगण्यासाठी. जणू काही त्यांची या जन्म मरणाचा फेर्यातून कधी मुक्तता नाही.
या यंत्रमानवांचा निर्माता डॉ रॉबर्ट फोर्ड हा एक अवलिया आहे. अँथनी हॉपकिन्स या मातब्बर अभनेत्याने हे पात्र रंगवले आहे. या पार्क मधल्या कथासूत्राची मांडणी, प्रोग्रामिंग टीम चे नेतृत्व ते पार्क च्या आतील लहान लहान तपशील याच्यात त्याची भावनिक आणि वैचारिक गुंतवणूक आहे. तो स्वतःला या जगाचा निर्माता म्हणवून घेतो. अशा प्रकारचे अगदी हुबेहूब मनुष्यासारखे यंत्रमानव तयार केल्यामुळे त्याच्यात एक प्रकारची घमेंड आहे आणि त्यामुळेच तो कुणालाही जुमानण्या पलीकडे पोचला आहे.
अशा या पार्क मध्ये काही रोबॉट्स मध्ये "चुकून" नवीन अपडेट्स जातात. त्यामुळे ही यांत्रिक पात्रे सजग होतात. आपल्याला या कधी न संपणार्या वेदनेच्या फेर्यात अडकवले गेले आहे याची त्यांना जाणीव होऊ लागते. स्वत्वाच्या शोधाची इच्छा आणि सदसदविवेकबुद्धी जागृत झाल्यामुळे त्यांची लेखकांनी ठरवून दिलेली कथासूत्रे बदलू लागतात. हे असे का होते आणि त्याच्यामागे कोण असते हा या मालिकेचे मध्यवर्ती रहस्य आहे.
सुरुवातीचे भाग पाहताना या मालिकेच्या निर्मात्यांनी बळे बळेच खूप बौद्धिक वगैरे करण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याची भावना होते. पण जसे जसे कथानक उलगडते तसे तसे त्यातले कंगोरे लक्षात येवून आपण काहीतरी भन्नाट बघतोय याची जाणीव होते. काय खरे काय मिथ्या, आयुष्याचा अर्थ आणि सर्वाचे सार शोधण्याची धडपड, भारतीय संस्कृतीत असलेल्या पुनर्जन्म, मोक्ष या संकल्पना आणि त्याचा अर्थ लावण्याची प्रक्रिया दिसून येते. आजकाल सर्वत्र वेगाने पसरत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या समूर्त रूपाचे दर्शन होते.
नोलन बंधूंची निर्मिती आहे त्यामुळे ओघानेच आले की ही मालिका खरेच डोक्याला ताण असणार. आणि मी हे चांगल्या अर्थाने म्हणतोय. बिनडोक मालिका पाहायच्या असत्या तर गेलाबाजार केकता कपूर हजर आहे.
या मालिकेतल्या कलाकारांचा अभिनय अतिशय सुंदर आहे, छायाचित्रण अप्रतिम. मालिकेचा विषय पचायला थोडा जड आहे आणि ही इतकीही उत्कंठावर्धक नाहीये. त्यामुळे माझ्या लिस्ट मध्ये तरी ती थोडी खालच्या लेवल वरच आहे. २०१६ ला चालू होऊन तिचा दुसरा सिझन संपलाय.
यावर अजून लिहिणे बाकी आहे
ब्रेकिंग बॅड, मॉडर्न फॅमिली, सूट्स, होमलँड
_*_
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!