अभिजात तुंबाड
"विरासत में मिली हर चीझ पर दावा नही करना चाहिये"
तुंबाड च्या नायकाला म्हातारी अखेरचं समजावून पाहते तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. ती फक्त त्या गुप्त धनाबद्दल बोलत नसते. विनायक त्या रिपरिप पावसात भल्यामोठ्या वाड्याचे द्वार उघडून आत निघालेला आहे. लोभीपणाला वैगुण्य न मानल्यामुळे आलेला कमालीचा आत्मविश्वास त्याच्या देहबोलीतून वाहतोय.
तुंबाड च्या ट्रेलर मध्ये ही दृश्य पाहून अपेक्षा खूप वाढल्या होत्या. काल सकाळी हा पिच्चर पाहिला तेव्हा बऱ्याच दिवसांनी अपेक्षांच्या पुढे गेलेला पिक्चर पाहिल्याचे फीलिंग आले.
तुंबाड हॉलिवूड च्या तोडीस तोड आहे.
त्याच्या गहिर्या अर्थाला बऱ्याच छटा आहेत. पण अर्थाला हात घालण्याआधी हा नितांत सुंदर सिनेमा थिएटर मध्ये अनुभवा.
आजीकडून आईकडून कधीकधी अशा कथा ऐकल्या होत्या. अमक्याच्या शेतात, विहिरीत, घरात गुप्तधन आहे, पण ते काढता येत नाही किंवा शापित आहे वगैरे वगैरे. या गोष्टी म्हणजे कल्पनेला मोकळे आकाश.
तुंबाड ने या गोष्टींना पडद्यावर उतरवले आहे. भयाण वाडा, धन, शाप ते धन मिळवण्यासाठीची विशिष्ट पद्धत, जर कुणी ती माहीत नसताना प्रयत्न केला तर काय? अशा मनोरंजक आणि तितक्याच भयाण कल्पनांना मूर्त स्वरूप दिले आहे.
तुंबाड चे चित्रण केलेली स्थळे आणि सेट्स आजवर मी कुठल्याही हिंदी मराठी सिनेमा मध्ये पाहिली नाहीत. प्रत्येक दोन मिनिटात या चित्रपटाच्या टीमचे कौतुक वाटल्याशिवाय राहवत नाही. घटनांचा वेग जबरदस्त आहे. तीन पिढ्या २ तासात डोळ्यासमोरून गेल्याचा भास होतो. काळाचे, समाजचे, बदलाचे अगदी बारकावे टिपत तो आपल्याला कथेत खेचून घेतो.
मला हॉलिवूड चे पिक्चर या कारणासाठी आवडतात की त्यांच्यामध्ये प्रेक्षकांना काही प्रसंगांचा अर्थ लावण्यासाठी मुद्दाम वाव दिलेला असतो. पडद्यावर असलेल्या प्रत्येक गोष्टीचा खुलासा न केल्यामुळे, आपल्याला स्वतःही कोडे सोडवल्याचा आनंद मिळत असतो आणि आपणही त्या चित्रकृतीचा भाग होतो. त्यामुळेच मेनस्ट्रीम हिंदी सिनेमे बघून एकमेव कोडे पडते ते म्हणजे 'डोके घरी ठेवून या' छाप पिक्चर का बनवले जातात हे.
तुंबाड बघतानाच तुम्हाला बरीच कोडी घालतो आणि ती सोडवायचा आनंद देतो. त्यामुळे मेनस्ट्रीम हिंदी प्रेक्षकांना थोडा भांबावून सोडू शकतो.
बाकी नंतर लिहीन. तूर्तास "हा सिनेमा बघाच" एवढेच सांगेन.
>>आजीकडून आईकडून कधीकधी अशा कथा ऐकल्या होत्या. अमक्याच्या शेतात, विहिरीत, घरात गुप्तधन आहे, पण ते काढता येत नाही किंवा शापित आहे वगैरे वगैरे.<< आणि एक नाग त्याचं रक्षण करतो. :-p
उत्तर द्याहटवा