कोंबडीने रस्ता का ओलांडला?




जर आपल्याला कधीतरी मरायचेच आहे, तर एवढे शिक्षण घेऊन व संपत्ती जमा करून उपयोग काय याचे तर्कशुद्ध उत्तर देऊ शकता का?






एक मजेशीर वैचारिक प्रश्न आहे.

"Why did the chicken cross the road?"

"कोंबडीने रस्ता का ओलांडला?"

का ओलांडला असेल? वरवर येडचाप वाटणाऱ्या या प्रश्नाला खरेच काही अर्थ आहे का?

.

.

.

कोंबडीने रस्ता ओलांडला कारण - ती रस्ता ओलांडू शकत होती. तिला वाटले रस्त्याच्या पलीकडे काहीतरी चांगले असणार. ओलांडला रस्ता.

तसेच या प्रश्नाचे उत्तर आहे.

"जर आपल्याला एक ना एक दिवशी मरायचे आहे तर एवढे शिक्षण घेऊन, संपत्ती जमा करून उपयोग काय आहे? "

शिक्षण घेतले संपत्ती जमा केली कारण ते आम्हाला शक्य होते म्हणून.

तुम्ही मला सांगा, जन्माला आलो तर मृत्यू येणार हे नक्की सर्वांना माहित असतेच. तुम्ही तुमचे आयुष्यात शिक्षण घेऊन, सुयोग्य पद्धतीने संपत्ती जमा नाही केली तरी देखील मृत्यू येणारच आहे. शिक्षण आणि संपत्ती टाळली म्हणून कोणी फार सुखी झाला आणि छान मृत्यू आला असे झाले आहे का? उलट शिक्षण आणि संपत्ती मुळे तुमचे आयुष्य आणि मृत्यू सहन करण्याइतपत चांगले होणार याची शक्यता वाढत नाही का?

बौद्ध धर्माचे एक तत्व आहे - "माणसाचा जन्म हा दुःख भोगण्यासाठी झाला आहे". थोडे निराशावादी वाटू शकते. पण खोलात पाहिले तर या वाक्याने एक मोठे ओझे उतरेल. दुःखच भोगण्यासाठी झाला आहे, तर येउदे दुःख आता काय मग.
पण चांगली गोष्ट ही आहे कि तुम्ही दुःख निवडू शकता. उदाहरणार्थ - अभ्यास करून शिक्षण घेणे, चांगली पदवी मिळवणे आणि मान मोडून काम करणे हे दुःखच आहे. पण हे दुःख तुम्ही स्वीकारलेले आहे. याउलट अभ्यास टाळून, शिक्षण मधेच सोडून आणि काम देखील टाळून तुम्हाला क्षणिक सुख मिळणार पण या सुखाची भरपाई कुठेतरी दारिद्र्य, अज्ञानाच्या च्या स्वरूपात येणाऱ्या दुःखामुळे होणार. मग स्वीकारलेले दुःख घ्यायचे कि नियतीने दिलेले दुःख घ्यायचे हे ठरवावे लागणार.

आणखी सोप्पे उदाहरण झाले तर, चांगली शरीरयष्टी कमवण्यासाठी रोज व्यायाम करणे, नियमित उठणे हे काय कटकट आहे. पण आत्ता हे दुःख घेऊन चांगले आरोग्य कमवायचे कि पन्नाशी ओलांडल्यावर स्थूल शरीर सांभाळत डॉक्टरांचे खेटे घालून दुःख भोगायचे हे ठरवावे लागणार.


एखादा गर्भश्रीमंत जन्माला आला आणि एके दिवशी मरायचेच आहे म्हणून आयुष्यभर काही कष्ट न करता तसाच राहिला, तर तो जगला काय आणि मेला काय कोणाला फरक पडणार आहे? शिवाय या असल्या आयुष्यात काय बेक्कार बोर होईल त्याला? किती दिवस नेटफ्लिक्स बघणार?

आयुष्यात सुख म्हणजे काय? आयते पंचपक्वान्नाचे ताट आणि झोपायला मस्त खाट मिळाली कि सुखच सुख का? असे फार कमी जणांना आयते मिळते. आणि मिळालेच तर मनुष्य स्वभाव असा आहे कि त्याला हे असले जगणे जास्त दिवस रुचत नाही. काहीतरी समस्या त्याला सोडवायला मिळाली नाही तर तो स्वतःच समस्या उभी करून सोडवायला बसतो.

मनुष्याला सुख मिळते ते समस्येचे समाधान करून. आपण जर निरखून बघितले तर आपला सर्वात जास्त सुखाचा काळ तो असतो जिथे आपण काहीतरी प्रश्नावर कष्ट करून वा हुशारीने तोडगा काढलेला असतो तो.

मागायचेच असेल तर देवाकडे चांगल्या समस्या मागाव्यात. कारण समस्या येणारच. एका बिगारी कामगाराला आणि एखाद्या कंपनीच्या मालकाला देखील समस्या सोडवाव्या लागतात. फरक असतो कि या कामगाराला उद्याच्या जेवणाचे काय, आणि कंपनीच्या मालकाला पुढच्या तिमाहीचे काय अशा वेगवेगळ्या समस्या सोडवाव्या लागतात. पण कनिष्ठ दर्जाच्या समस्या सोडवायच्या का जास्त परिणाम करणाऱ्या समस्या सोडवायच्या हे ज्याने त्यानेच ठरवायचे.


अर्थात आपण कोणती समस्या कशासाठी सोडवत आहोत याचे भान ठेवायला हवे. कोणी आपल्याला हवी तेवढी संपत्ती जमा झाली तरी त्याच्यावर अगदी मरमर करून संपत्ती जमा करत आहे, त्यात आयुष्याच्या इतर गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे, असे असेल तर त्याचा काय उपयोग?

पण मला कधीकधी या संपत्ती गोळा करणाऱ्यांचे देखील कौतुकच वाटते. काहीवेळा ते अगदी तल्लीन होऊन हे काम करत असतात. त्यांच्यासाठी संपत्तीचे आकडे हा एक खेळच झालेला असतो. एखादी मोबाईलची गेम असावी तसा त्या वाढणाऱ्या संपत्तीच्या पॉईंट्स मध्ये ते मजा घेत असतात. आता अशा लोकांना जर त्यातच आनंद असेल तर आपल्याला काय प्रॉब्लेम असावा? शेवटी सगळेच जण आपापली गेमच खेळत असतात ना.. कुणी चित्रकार एकावर एक चित्रच काढत बसला, कुणी एकानंतर एक ढीगभर पुस्तकेच वाचत बसला आणि कुणी नुसतीच सेवा आणि त्याग करत बसला त्यातलाच हा प्रकार.

हा दृष्टिकोनातला फरक आहे. मनुष्य जन्माला अर्थच नाही म्हणजे सगळे निरर्थकच असेल तर याचा अर्थ असाच होतो कि तुम्ही पाहिजे त्याला अर्थपूर्ण म्हणू शकता. कारण जर कशालाच अर्थ नाही तर एखाद्या गोष्टीला अर्थ दिला तर काय फरक पडतो?

आता येऊया शिक्षणावर - जरी कोणाला आता वाटत असेल की - मी आपला साधेच जीवन जगणार, त्यामुळे जेमतेम शिक्षण घेतले तरी मला पुरे. अहो पण एक गोष्ट लक्षात घ्या. कितीही म्हंटले तरी शिक्षणाचे वय साधारण कोवळेच असते. एकदा का हा काळ गेला आणि तुम्हाला नंतर वाटले कि साधे जीवन नको रे बाबा.. देशोदेश फिरायचे आहे, चांगले चुंगले खायचे आहे, महागडी कार फिरवायची आहे तर? आली का पंचायत? अगदी शक्यच नाही असे नाही, पण आलेच ना कष्ट परत?

आता उलट पहा.. चांगले ध्येय ठेवून शिक्षण घेतले, आणि नंतर तुम्हाला वाटले कि साधेच जीवन जगायचे आहे, तरी काय प्रॉब्लेम आहे? बरे आहे की.. चांगल्या शिक्षणाने किंवा जमा केलेल्या संपत्तीमुळे साधे जीवन जगता येत नाही असे होणार आहे का? आलीच विरक्ती तरी तुमच्या शिक्षणाचा आणि संपत्तीचा उपयोग तुम्ही जनकल्याणासाठी देखील करू शकता. पर्याय नाही म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षा पर्याय आहे तरी करणे मलातरी कधीही भारीच वाटेल.
गौर गोपाळ दास

इस्कॉन चे प्रेरणादायी संन्यासी गौर गोपाळ दास हे उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व आहे. पुण्याच्या सीओइपी मधून इलेक्ट्रिकल इंजिनीयर झाल्यावर ह्युलेट पॅकार्ड सारखी आंतराष्ट्रीय कंपनी सोडून त्यांनी दीक्षा घेतली. आज त्यांच्या या उच्चशिक्षणाच्या पार्श्वभूमीमुळे त्यांचा काही तोटा झाला असे वाटत नाही. उलट विज्ञान - अध्यात्माच्या कोणत्याही विषयावर ठामपणे ते आपले मत मांडू शकतात.

_*_


चित्र पिक्साबे वरून साभार.

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक