ते देवाचं असतं !
पुण्याजवळ वाघोलीच्या पुढे वाडेबोल्हाई हे गाव आहे. तेथील बोल्हाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे.
पुण्याजवळच्या गावांतील काही कुटुंबांना या देवीचे काही नियम लागू होतात. याला देवी आहे असे म्हणतात. उदाहरण म्हणजे माझ्या कुटुंबाला बोल्हाई आहे. या देवीला शेळी (बेकरीचे) बळी चालत नाही. मेंढी चालते. साहजिकच ज्या कुटुंबाना ही देवी आहे त्यांना बेकरीचे मटन वर्ज्य असते. म्हणजे आमच्या कुटुंबात कधीच शेळीचे मटण खात नाहीत. तसे पाहिले तर मटणच फार कमी वेळा होते पण खाल्लेच तर मेंढीचेच.
माझी आजी तर असे म्हणायची की या बोल्हाई असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना शेळीच्या मटणाचे खरकटे पाणी देखील ओलांडायचे नसते. जर शेळीचे मटण खाण्यात आले तर शरीरावर काहीतरी पुरळ, खाज या स्वरूपात प्रतिक्रिया उठतात. नंतर बोल्हाईला जाऊन काहीतरी विधी करावे लागतात. हे असे असल्यामुळे या व्यक्ती शेळीच्या मटणाच्या खानावळी हॉटेल्स टाळतात. त्यामुळे जसे काही हॉटेल्स वर जसे "शुद्ध शाकाहारी" लिहिलेले असते तसे काही ठिकाणी "फक्त बोल्हाई चे मटण" अशी पाटी असते. उद्देश हाच की हे शुद्ध बोल्हाई वाल्या लोकांचे संपूर्ण समाधान व्हावे.
माझा वैयक्तीक अनुभव सांगतो
माझ्या वडिलांच्या कुटुंबात बोल्हाई आहे. आईकडच्या कुटुंबात नाहीये. त्यामुळे माझी आई जेव्हा लग्नानंतर सासरी आली तेव्हा तिला देखील बोल्हाई लागू झाली.
आता मी बऱ्याचदा बाहेर जेवायला गेलो तर मटण खात नाहीच, चिकन च आवडते. पण आलाच प्रसंग तर जसे प्लॅटर किंवा बुफे मध्ये मटण कोणते आहे हे विचारूनच खातो.
मी घरातल्या वडीलधारी मंडळींना विचारून बघितले की निवडक कुटुंबांवर या निर्बंधांचे काय कारण असावे? पण कुणीही देवाचं असतं यापलीकडे काही सांगू शकले नाही.
शेवटी विचारांती मीच तर्क लावला. हा फक्त तर्क आहे. मी कुठेही याची खातरजमा केलेली नाही.
याचे कारण असावे जनुके आणि ऍलर्जी. एखादया गोष्टीचं वावडं असणे.
शेळीचे मटण मेंढीच्या मटनापेक्षा थोडे उष्ण असते. आणखी संप्रेरकांचे बरेच फरक असतील. जुन्या काळी काही लोकांनी निरीक्षण केले असेल की काही कुटुंबातील व्यक्तींना शेळीच्या मटणाची ऍलर्जी असेल. बापाला पण असेल मुलालाही असेल आणि नातवातही तीच लक्षणे दिसली असतील. आता त्यावेळी ऍलर्जी कशामुळे होते हे माहीत नसावे पण पिढ्यांनपिढ्या ही गोष्ट लक्षात राहावी म्हणून देवीसोबत त्या गोष्टीचा संबंध लावून या वर्ज्य असलेल्या गोष्टीला कुटुंबापासून दूर ठेवण्याची व्यवस्था केली गेली.
श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा पण मी जरी त्या काळी असतो तरी ही अशीच व्यवस्था केली असती. कारण लोक देवाला जेवढं गंभीरतेने घेतात त्यासारखं कुठल्याच गोष्टीला घेत नाहीत.
तसे बघायला गेलो तर आमच्या घरात कोणी फार जास्त मटणाचे शौकीन नाहीतच. म्हणून उगाच कशाला नसती उठाठेव म्हणून शेळीचे मटन कोणी जाणूनबुजून खाल्लय असं कधी ऐकण्यात आलं नाही. आणि जर माझ्या वरचा तर्क खरा असेल तर ऍलर्जी सरसकट सगळ्यांना होणार नाही.
_*_
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!