अंतरीचा दिवा
सध्याच्या सरकारी नोकरीच्या कमी संधी पाहता, मुलांना व्यवसायिक शिक्षण देणे आवश्यक आहे का?
एक प्रतिष्ठित सरकारी नोकरी मिळते म्हणून एमपीएससीचा अभ्यास करणे कितपत योग्य आहे?
एक गोष्ट सांगतो. माझा बालमित्र अमोलची. आम्ही दोघे इंजिनियरिंग सुद्धा एकाच कॉलेजला होतो. तो इलेक्ट्रिकल आणि मी मेकॅनिकल. आम्ही दोघे अगदी फार हुशार नाही पण सुखासुखी इंजिनियरिंग पास केलेले असे सर्वसाधारण विद्यार्थी. मध्यवर्गीय पालक. आम्ही दोघे तसे घरातले पहिल्या पिढीतले ग्रॅज्युएट. त्यामुळे आमच्या पालकांची खरंच कृपा. त्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या मोजक्या अनुभवातून आम्हाला चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या.
अमोलने आणि मी आर्मी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी साठी मोघम प्रयत्न केले. नाही मिळाले. मला त्यातल्या त्यात समाजशास्त्राची आवड असल्याने मी थर्ड, फोर्थ इयरला एमपीएससी/ युपीएससी चे अधिकचे वर्ग केले होते. आम्ही जिथे राहायचो त्या एसआरपीएफ मधल्या सहृदय कमांडंट आयपीएस वी. लक्ष्मीनारायण यांच्या पुढाकारातून हे वर्ग चालू झाले होते. आणि त्यांचा प्रभाव होताच. त्याबद्दल जास्त लिहीत नाही. इथे वाचू शकता. - http://alspensieve.blogspot.com/2012/04/blog-post_01.html
तर ग्रॅज्युएशन नंतर GATE स्कोर मुळे NIT मिळत होती पण त्याच दरम्यान सॉफ्टवेयर कंपनीमध्ये ऑफर मिळाली आणि मी ती घेतली. अमोल त्या दरम्यान महाराष्ट्र इलेक्ट्रिक बोर्ड - एमएससीबी मध्ये ज्युनियर इंजिनीयर म्हणून जॉईन झाला.
सगळ्यांना खूप कौतुक होते त्याचे. पहिल्याच प्रयत्नात सरकारी नोकरी आणि तीपण MSEB मध्ये. पोलीस शिपायाचा मुलगा सरकारी अधिकारी झाला. लोकांनी त्याच्या उत्पन्नाचे अंदाज लावायला चालू केले.
अमोल तसा सरळ माणूस. पुणे जिल्ह्यातल्या एका गावात पोस्टिंग मिळाली. काम काय फारसे नव्हते. वायरमन आणि लाईनमन सगळे बघून घेत होते. आणि न चुकता रोज एक पाकीट याला मिळायचे. नाही म्हणण्याची सोय नव्हती. कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंत ती एक चेन होती. "लोक स्वखुशीने देतात" सरकारी कार्यालयात सर्वांनी मनाचा समज करून घेतलेला असतो. नाहीतर झोप येईल का त्यांना?
अमोल ला नाही यायची झोप. "मला नको पाकीट" सांगून बघितले. पण कधी प्रेमाने, कधी दटावून कधी जहारहाटीचे पाठ पढवून त्याला त्यांच्यात एकरूप व्हावे लागले. माझ्याशी पण बोलायचा. "अरे हे काय अनपेक्षित आहे का? उगीच सरकारी नोकऱ्यांसाठी लाईन लावतात का?" मी समजवायचो. त्याचा कोंडमारा मलाही समजायचा. "सोडून द्यावीशी वाटते नोकरी" तो म्हणायचा. सगळे रुळतात हळूहळू. सरकारी नोकरी कोण सोडतं. माझ्या मनाची समजूत पण मीच घालायचो.
एक दिवस त्याचा फोन आला. आशिष, मी सोडतोय. नाही मन लागत. आई वडिलांशी बोललोय. मला काय बोलावे समजले नाही. "सरकारी नोकरी कोणी सोडत नाही" एवढेच माहिती. त्याला किती लोकांनी नाही नाही ते सल्ले दिले असतील याची कल्पना नाही. पुढची सहा सात महिने अभ्यास करून अमोल सीडॅक कोर्स करून पुण्यातल्या नामांकित सॉफ्टवेयर कंपनीमध्ये लागला देखील.
वर्षभरातच २००८ च्या मंदी मध्ये नोकरकपात झाली आणि अमोल परत मोकळा झाला. यावेळी दोन वर्ष त्याने जर्मन भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी पुण्यातल्या एका जर्मन कॉपीरायटर कंपनीत आधीच्या पगाराच्या अर्ध्या पगारात काम केले असेल. दरम्यान त्याचे लग्नही लावून दिले कुटुंबाने. त्याने पार्ट टाइम अभ्यास करून मॅक्सम्युलर मधून B1 सर्टिफिकेट मिळवले आणि पुढच्या ध्येयाकडे वाटचाल चालू केली. जर्मनीमध्ये MS. घरची परिस्थिती तशी काय फार चांगली असे नव्हते. पोलिसाच्या पोरांना असा काय वारसा. तरीपण आई वडील, बायको आणि मित्रांच्या सहकार्याने जर्मनीमध्ये ऍडमिशन घेतले. ३ वर्ष खडतर परिश्रम घेतले.
मी स्वतः ते बघितले. त्याचाच आदर्श घेऊन मी पण त्याच दरम्यान युरोपमध्ये शिकायला गेलो होतो. फरक हा होता की बरीच वर्ष सॉफ्टवेअर मध्ये नोकरी केल्याने माझी परिस्थिती बरी होती. त्याच्याकडे सुट्टीदरम्यान जर्मनी आणि हॉलंड च्या सीमेवरच्या क्लेवे (Kleve) या गावात राहिलो. अमोल म्हणाला, "आशिष तू आलाय म्हणून एवढा किराणा आणला. नाहीतर एवढ्या बजेट मध्ये महिना काढतो मी".
अमोल ने तिथे VW मध्ये हंगामी कामगार, ऍमेझॉन मध्ये डिलिव्हरी बॉय असे उद्योग करत स्वतःच्या खर्चाची सोय स्वतः करत तीन वर्षात MS केले. अगदी टिच्चून नोकरी मिळवली. आणि आता बायकोबरोबर जर्मनीतच आहे. तीही जॉब करत आहे. मागच्या महिन्यातच मर्सिडीज घेतली.
या सर्व स्टोरीचा काळ ७-८ वर्षाचा आहे. या दरम्यान त्याला किती अडचणी आल्या, त्याने त्यावर मात करत काय काय दिव्य केले याचा स्वतः साक्षीदार असून मला त्याची संपूर्ण कल्पना नाही.
सांगायचा मुद्दा असा कि, जशी ऐन तारुण्याचा काळ एमपीएससी, युपीएससी च्या मागे दवडून शिष्टीम ला नावं ठेवणारी जमात आहे तशी अमोल सारखी सुखासुखी सरकारी नोकरी सोडून जागतिक संधीचा वेध घेणारी पोरं देखील आहेत. अर्थात नशिबाचा भाग असतोच. पण प्रशासकीय परीक्षांच्या मागे लागून बरेच जण त्यांचे नशीब दुसऱ्याच्या हवाली करतात. एक दोन वर्षे जोर लावून प्रयत्न करणे ठीक. पण वर्षानुवर्षे काहीही कामधंधा न करता कोणत्याही कौशल्याचा विकास न करता नुसत्या स्पर्धा परीक्षेच्या मृगजळामागे धावणे कितपत योग्य, याचा विचार करणे गरजेचे नाही का?
दुसरे म्हणजे तुम्ही तारुण्यात कौशल्य विकास नाही केला तर कधी करणार? अमोलच्या उदाहरणात कोणाला वाटू शकते की त्याने मोठीच रिस्क घेतली आणि पैसे गुंतवले असतील. खरे? अरे तारुण्याची वर्षे म्हणजे किती मोठी किंमत आहे? ती तुम्ही कुठे गुंतवता याने तुमच्या आयुष्याची दिशा ठरत नाही का? तुमच्या एका एका तासाची किंमत नाही का?
दुसरे म्हणजे आमच्या सारखे बरेच जण मध्यमवर्ग किंवा गरीब घरातून शिक्षण वगैरे करून समृद्धीकडे वाटचाल करत असतात. लवकर स्वतंत्रपणे कमाई, गुंतवणूक, बचत आणि कौशल्यविकास चालू केल्याने पस्तिशी नंन्तर एक स्थैर्य येते. बालेकिल्ला सुरक्षित झालेला असतो. अशा वेळी नवीन मोहिमेला जास्त रिस्क न घेता सुरुवात करता येते. जसे स्वतःचा उद्योग, स्वत्वाचा शोध, आवडीचे क्षेत्र. कौशल्य असेल तर आर्थिक सुरक्षितता देखील एवढी महत्वाची वाटत नाही.
काहींना वाटू शकते की आम्ही इंजिनीयर होतो आणि त्यांना बऱ्यापैकी संधी होत्या. असे असेल तर आमच्या ऑफिस मधल्या अनिलचे उदाहरण देतो. बारावी नंतर ऑफिसबॉय म्हणून लागला. पार्ट टाइम बीएससी केले. सिस्टीम ऍडमिन चा ऑनलाईन कोर्स केला. आणि ऑपरेशन मॅनेजर झाला. हाताखाली दोघे जण आले. तिथे न थांबता गावाकडे गाईच्या गोठ्याचा प्रयोग चालू केला. या वर्षी पगाराच्या चौपट उत्पन्न दुधातून चालू झाले तेव्हा नोकरी सोडली. त्याचा दुग्धजन्य उत्पादनाचा ब्रँड घेतला आहे. झेप अजूनही मोठी आहे. त्याची सर्वांना एवढी सवय झाली होती की ऑफिस ने त्याला कन्सल्टन्ट म्हणून जोडून ठेवले आहे. हाही ८-१० वर्षाचा प्रवास आहे..
असे उद्यमी लोक आहेत आसपास. ही दोनच उदाहरणे दिली अशी बरीच उदाहरणे आहेत. त्यांना बघायला हवे त्यांचे आदर्श हवेत. या लोकांना हारतुर्यांचे काही पडलेले नसते. कोणी त्यांना व्याख्यान द्यायला बोलावत देखील नाही. ज्यांना बोलावतात, त्यांनाच आदर्श मानले जाते. मराठी लोक रिस्क घेत नाहीत म्हणे. बघा आजूबाजूला. बरेच अनिल आणि अमोल मिळतील. अभ्यासिकेत बसून राहिलात तर परीक्षा देणारेच दिसतील. नाहीका?
माझे म्हणाल तर वर म्हंटल्याप्रमाणे अमोल, अनिल सारखी उदाहरणे समोर आहेत. बालेकिल्ला सुरक्षित केलेला आहे आणि उद्यमशीलतेचे प्रयोग सुरु केले आहेत. शेवटी आयुष्य म्हणजे तुमच्या क्षमतांचा, जाणिवेचा विस्तार. नाहीका?
आशिषजी,कसलं भारी व प्रांजळपणे व्यक्त झालाय तुम्ही...! खूपच छान...!👍👍👍
उत्तर द्याहटवासुंदर अचिव्हमेंट आणि प्रेरणा देणारं लिखाण नि अनुभव असुन चालत नाहीत ते प्रभावीपणे व्यक्त करता यायला हवेत ते अतिशय परिणामकारकपणे आपण मांडलेत .नविन पिढीला भिडतील यात शंका नाही.
उत्तर द्याहटवा