राष्ट्र आणि राष्ट्रवाद
हजारो वर्षांचा तथाकथित दैदिप्यमान इतिहास आणि वैभव असलेली ही भारतभूमी शेकडो वर्षे परकियांच्या आक्रमणासमोर हतबल का झाली? कुणीच का टिकू शकले नाही?
या प्रश्नाला बरेच कंगोरे आहेत.
"हजारो वर्षांचा तथाकथित दैदिप्यमान इतिहास आणि वैभव असलेली ही भारतभूमी"
प्रश्नाच्या या भागात थोडा खोचकपणा जाणवतो.
दैदिप्यमान इतिहास म्हणजे नक्की किती काळासाठी होता हे कसे ठरवणार? कारण गेल्या ७५ वर्षासारख्या तुलनेने कमी कालखंडात देखील भारतात ६५ चे युद्ध, ७१ चे युद्ध, आणीबाणी, दंगली, अणुस्फोट, दुष्काळ, लायसेन्स राज, भ्रष्टाचार घोटाळे, आयटी क्रांती, आनंदवनासारख्या सेवेकरी संस्था, शेतकरी आत्महत्या, मध्यमवर्गाचा उदय, उदारीकरण असे कितीतरी चांगलया आणि वाईट घडामोडी घडल्या. तर "हजारो" वर्षांमध्ये काय काय घडले असेल. काही गोष्टी चांगल्या असतील काही वाईट. या सर्वांमधून किमान "भारतभूमी" ही ओळख अंशतः तरी आपण टिकवून ठेवली म्हणून सोयीसाठी म्हणूया "हजारो वर्षांचा दैदिप्यमान".
आता तथाकथित या शब्दावर येऊ.
एखाद्या राष्ट्राला दैदिप्यमान इतिहास आहे किंवा नाही हे कोण ठरवते? - बऱ्याचदा त्या त्या राष्ट्राचे नागरिक. (बाकीच्यांना काहीही पडलेले नसते)
आता काही लोक असतात प्रखर राष्ट्रवादी. माझा देश गौरवशाली आहे - हा राष्ट्रवाद. हा माझ्यामते चांगला. आणि माझा'च' देश गौरवशाली आहे - हा आक्रमक राष्ट्रवाद.
कुणाला चांगल्या राष्ट्रवादाचा त्रास का व्हावा हे माझ्या आकलनापलीकडचे आहे. शेवटी राष्ट्र म्हणजे एक मानवी कल्पना आहे. त्या कल्पनेशी कुठली भक्कम भावना नसेल तर माणसे त्या कल्पनेशी जोडली जाणार नाहीत. हा निसर्गनियम आहे.
माणूस सर्वप्रथम स्वतःच्या गरजा भागवतो, त्यांनतर कुटुंबाच्या, त्यानंतर कबिल्याच्या किंवा भाऊबंदांच्या, मग गावाबद्दल विचार करेन आणि करता करता राष्ट्राबद्दल. कोणी म्हणेल कि विश्वापर्यंत का नको? नाही जात सामान्य माणसाची मजल. तसे तर कुटुंबाच्या पुढेही जात नाही बऱ्याचदा. पण तो कर भरतो, नियम पाळतो, राष्ट्राच्या कायद्याचा मान ठेवतो हे तो एका राष्ट्र या संकल्पनेचा स्वीकार करतो म्हणूनच ना? त्यात जर अभिमानाची, प्रेमाची सकारात्मक भावना असेल तर बिघडले कुठे?
अशी सकारात्मक भावना येण्यासाठी त्या देशाचा इतिहासातील काही चांगल्या घटना घेऊन या भावनेला कथेचे एक कोंदण दिले जाते. आता या कथेला continuity हवी. उदाहरणादाखल मी शिवाजी महाराजांना मानतो म्हणून क्ष पद्धतीने आचरण करतो. पण शिवाजी महाराजांनी जे केले ते का केले? तर स्वराज्यासाठी, मग स्वराज्य म्हणजे काय? हे काय, कशासाठी कितीही मागे जाऊ शकते. म्हणून कथा ती जितक्या लांब नेता येईल तेवढी नेली जाते. म्हणजे इतिहास हजारो वर्षे मागे नेला जातो. त्याला आपण दैदिप्यमान सारखी विशेषणे लावा किंवा आणखी काहीबाही. माझ्यामते नागरिकांना एक ध्येय आणि जगण्याचा हेतू देण्यासाठी या गोष्टी हव्यात"च". वर्तमानात समाजमानसाला गुण्यागोविंदाने जगून प्रगतीकडे जायचे असेल तर इतिहासाचा संदर्भ लागतोच. कारण तो नसेल तर मेंढरांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक संपतो आणि राष्ट्र आणि समाज हि संकल्पना देखील.
आपल्या काही लोकांना इतिहास जरा जास्तच दैदिप्यमान वाटतो यात विषाद नसावा. जगात सगळ्या राष्ट्रांमध्ये असे लोक असतात.
माझा एक इथिओपियन रूममेट होता ऑस्ट्रिया मध्ये शिकत असताना. इथिओपिया जगाच्या नकाशात कुठे आहे हे बऱ्याच वाचकांना सापडणार नाही. त्याला काय अभिमान त्याच्या देशाचा. मला म्हणायचा कि - "इथिओपिया कधी कोणाचा गुलाम झाला नाही. ख्रिश्चन धर्माची सर्वात ओरिजिनल लोक इथिओपियात आहेत. इथिओपियन्स ने त्यांच्या देशातून इटालियन्स ने लुटून नेलेला ओबेलिस्क[1] (दगडाचा खांब) परत आणला कायदेशीर लढाई लढून."
इथपर्यंत मी वा, भारीच रे.. वगैरे वगैरे प्रतिसाद द्यायचो. मलाही त्या कथा सुरस वाटायच्या. एकदा भाऊ वेगळ्या मूडमध्ये गेला. म्हणाला, "आम्ही बघ कसा आमचा ओबेलिस्क आणला परत देशामध्ये. तुम्हा भारतीयांना तुमचा कोहिनुर पण आणता येत नाही." हे असं म्हंटल्यावर मग माझा पुण्याचा 'जाज्वल्य' राष्ट्रवाद जागा झाला. त्याला म्हणालो - "आम्हाला इतिहासातले दगड आणण्यात रस नाही. आम्ही ब्रटिशांकडून आधुनिक जगातली औदयोगिक रत्ने हिसकून आणतोय"
(We are not interested in bringing back relics of the past. We are snatching jewels of the present industrial world from them)
आणि मग त्याला रतन टाटा माझे तीर्थरूप असल्याच्या अविर्भावात जग्वार लँडरोव्हरच्या संपादनाबद्दल[2] सांगितले. तो परत भारताच्या वाट्याला गेला नाही.
सांगण्याचा मुद्दा असा कि जगातल्या कुठल्याही राष्ट्राच्या व्यक्तीला त्याच्या राष्ट्राबद्दल अभिमान असू शकतो, नसता तर ते राष्ट्र अस्तित्वात नसते. त्यात भारतीय जरा अतीच करतात असे नाही.
"शेकडो वर्षे परकियांच्या आक्रमणासमोर हतबल का झाली?"
हतबल झाली का नाही याचा उहापोह आपण उत्तराच्या पुढील विभागात पाहू. तूर्तास असे मानून चालू कि हतबल झाली.
१. तंत्रज्ञान २. मुत्सद्देगिरी (diplomacy) ३. आत्मसंतुष्टता (complacency)
मध्यपूर्वेतून भारतावर कितीतरी आक्रमणे झाली असतील. त्यातील कितीतरी परतवण्यात आली असतील. तरीही काही मोजक्या लढायांना महत्व दिले जाते कारण त्यानंतर झालेले सत्तापालट भारतीय उपखंडाची रूपरेषा बदलवून गेले. या लढाया आक्रमकांनी जिंकल्या कारण बऱ्याचदा त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे (त्याकाळातली) आली होती जी भारतीय शासकांकडे नव्हती किंवा उशिरा पोचली होती. मोगलांचे उदाहरण द्यायचे झाले तर त्यांच्याकडे अधिक चांगल्या प्रकारचे धनुष्यबाण होते आणि त्यांचे सैनिक ते घोड्यावरून चालवण्यात वाकबगार होते. पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबराने तोफांचा चांगला वापर केला. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अब्दालीने उंटांवर छोट्या तोफा बसवल्या होत्या.
भारतातील राज्यकर्ते मुत्सद्देगिरीत उत्तरोत्तर कमी पडलेले दिसतात. तह किंवा कराराने शेजारील राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करणे, संघराज्य बनवणे या कल्पना अगदी महाभारत काळापासून होत्या. त्यातूनच चक्रवर्ती सम्राट, महाजनपदे अस्तित्वात होती. एकछत्री अंमलमुळे निदान "वयं पंचाधिक शतम" (आम्ही एकशेपाच) ही भावना परकीय आक्रमकांना तरी थोपवून धरण्यात यशस्वी झाली असे म्हणू शकतो. हेच दुसऱ्या सहस्त्रकात दिसत नाही. पृथ्वीराज चव्हाणांच्या पाडावापासून ते मोगलांनी एकछत्री अंमल आणेपर्यंत संघराज्य असे नव्हतेच. राजपुताना देखील एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या लहान राज्यांचा समुदाय होता ज्याला कोणी एक सम्राट नव्हता. मराठी साम्राज्यचे देखील पतन एकछत्री नेतृत्वाच्या अभावामुळेच झाले असल्याचे दिसते. याउलट इस्लामी आक्रमक म्हणा किंवा ब्रिटिश म्हणा, त्यांनी मुत्सद्देगिरी वापरून चातुर्याने साम्राज्यविस्तार केला.
भारतीय शासनकर्त्यांची आत्मसंतुष्टता देखील या हतबलतेला कारणीभूत झाली असेल. मध्यपूर्वेत इस्लामी राजवट बाळसे धरत असताना उलट भारतीय राज्यकर्त्यांनी दूरदृष्टी ठेवून एक बलशाली संघराज्य बनवायला हवे होते. हे संकट कधीना कधी दारावर येणार हे समजून उपाययोजना देखील करायला हव्या होत्या. तिथे आपण कमी पडलो. आक्रमकांनी बळकावलेला प्रदेश परत जिंकण्यासाठी मराठे आणि शीख सोडून प्रयत्न झाल्याचेही दिसत नाही.
चला असे म्हणू कि मुघल आपलेच झाले. त्यांनीदेखील स्थैर्य आल्यावर एक दोन पिढ्यांनंतर खजिना रिता करून भव्य महालच बांध, समाजाच्या देवस्थानांची मोडतोड कर, सहयोगी राज्यांना डिवच हेच धंधे सुरु केले. त्यातून त्यांचा एकछत्री अंमल संपला.
राष्ट्र कितीही बलशाली असले तरी जगाच्या पाठीवर काय चालले आहे त्याबद्दल सजग नसेल आणि त्यासाठी सतत उपाययोजना करत नसेल तर त्याचे तुकडे होणारच.
“Hard times create strong men, strong men create good times, good times create weak men, and weak men create hard times.”
त्यामुळे सुबत्ता जर असेल तर ती टिकवण्यासाठी उलट प्रयत्नपूर्वक खंबीर आणि काटक पिढी घडवावी लागते. आजच्या युगात अमेरिका याचे चांगले उदाहरण आहे. मला अमेरिका या कारणासाठी आवडते.
कुणीच का टिकू शकले नाही?
हे जरा कठोर आहे. खरेच कुणीच टिकले नाही? मागच्या परिच्छेदात म्हंटल्याप्रमाणे तीन युद्धांना आपण जास्त महत्व देतो कारण तिथे आक्रमणकर्ते जिंकले. त्याआधी कितीतरी युद्धामध्ये यशस्वीरीत्या आक्रमणे परतून लावली गेली असतील. त्याचे काहीच मोल नाही? असे म्हणताना तुम्ही त्या युद्धांना गृहीत धरत आहात. अगदी १९७१ चे युद्ध घ्या. त्यात भारताचा पाडाव झाला असता तर?
भारत स्वतंत्र झाला तेव्हा ५०० च्या वर संस्थाने होती आणि ब्रिटिशांनी त्यांना सरसकट स्वातंत्र्य देऊन तुम्ही तुमची काशी करा म्हणून निघून गेले. त्या ५०० संस्थानामध्ये मोठी मराठी संस्थाने होती. ग्वाल्हेर, बडोदा, नागपूर, इंदोर, कोल्हापूर या संस्थानांनी भारतात विलीन होण्याचे पटकन मान्य केले. त्रास कुणी दिला? जुनागड, हैद्राबाद. कल्पना करा मराठे छोटेसे स्वराज्य स्थापन करून पुण्यात बाकरवडी खात बसले असते आणि मराठा साम्राज्य झालेच नसते किंवा राजपूत आणि शिखांनी प्रतिकार केला नसता तर आज भारतापेक्षा पाकिस्तान मोठा असला असता. त्या देशाशी घेणे देणे नाही, पण त्यांनी मुस्लिम सोडून बाकीच्या धर्मियांना थारा दिला असता का?
१८५७ चे बंड देखील एक प्रकारे विजयच होता. त्या युद्धानंतर वर्षभरातच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून राणीने कारभार काढून घेतला. दगडापेक्षा वीट मऊ.
त्यामुळे कुणीच टिकले नाही आणि सगळेच टिकले हे दोन्हीही तितकेसे बरोबर नाही.
आता पुढे काय? इतिहास भूतकाळ आहे. पुढे काय करायचे?
जगाच्या बरोबरीने चालायचे. भले आपण अध्यात्मिक आहोत, हे विश्वची माझे घर वगैरे वगैरे.. ठीके. तरीही जिसकी लाठी उसकी भैस या न्यायाने जग चालणार हे मान्य करायचे. एके काळी विज्ञान तंत्रज्ञानात भारत पुढे होता. आता तो काळ नाही. जग पुढे निघून गेले आहे. ६० च्या दशकात मिग-२१ विमाने तंत्रज्ञानाचा सर्वोत्कृष्ट नमुना होती. अवघ्या ५० वर्षात ती अतिशय कालबाह्य झाली आहेत. त्यामुळे "हजारो" वर्षांपूर्वी ह्याव माहिती होते त्याव माहिती होते हे सोडून आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरायची. जुन्या शास्त्रांत जे चांगले असण्याची शक्यता आहे ते संशोधनाने सिद्ध होतंय का जरूर पाहावे पण त्यात तथ्य नसेल तर सोडून पुढे चालावे.
मुत्सद्देगिरी, व्यावसायिक दृष्टिकोन, आधुनिक शस्त्रे, अर्थकारण याचे भान ठेवून त्यादृष्टीने जगाच्या एक पाऊल पुढे राहता येईल का बघायचे. अमेरिकेसारख्या धूर्त आणि हुशार राष्ट्राचा संग ठेवायचा. चीनला शिव्या देण्यापेक्षा त्यांच्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या.
तात्या, नाना, दादा, भाई, सरकारी बाबू यांचा उपद्रव कमीत कमी ठेवायचा. हिंदू-मुस्लिम, जात-पात, आरक्षण यांचा आयटेम डान्स चालूदे वाहिन्यांवर. तो येड्या लोकांसाठी बरा टाईमपास असतो. हुशार आणि कष्टाळू माणसांच्या मार्गातले धोंडे दूर करायचे. संशोधकांना येड्यांपासून लांब ठेवायचे. म्हणजेच चांगली स्वयंपूर्ण विश्वविद्यालये राखायची आणि नवीन बनवायची. चांगले शिक्षक तयार करायचे. लहान मुलांना घडवायचे. चांगले वकील, तंत्रज्ञ, कारागीर, व्यवस्थापक, वाटाघाटी तज्ञ, डॉक्टर्स, सामरिक तज्ञ, अर्थतज्ञ, शेतकरी, वेगवेगळ्या विषयांचे जाणकार घडवायचे. त्यांच्या मार्गातले अडथळे काढायचे. समान संधी उपलब्ध करून द्यायच्या. महासत्ता वगैरे लै पुढच्या गोष्टी. सध्या हे पुरे. अमेरिका चांगली महासत्ता आहे तशी. त्यांच्या संगतीने 'मगरीबाई तुझी पाठ मऊ' म्हणत आपली प्रगती चालू ठेवायची.
_*_
तळटीपा
https://qr.ae/pG3Pg4
[1] Obelisk of Axum - Wikipedia
[2] Ashish Shete (आशिष शेटे)'s answer to Why did Tata buy Jaguar?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!