चिमणी उडाली भुर्रर्र
----
मी ब्राह्मण समाजातला नाही.
----
मला वाटते "संस्कृतवर केवळ ब्राह्मणांचाच अधिकार होता" हे ना एक ब्लँकेट स्टेटमेंट आहे. म्हणजे एखाद्याला हवा तोच निष्कर्ष काढण्यासाठी केलेले सरसकट विधान.
अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत बहुजनांमध्ये "शिकून कोणाचं भलं झालंय" हे वाक्य फार प्रचलित होते. म्हणजे एकंदरीत शिक्षणाबद्दल उदासीनताच होती. आणि संस्कृत शिकून कोणी फार मोठा विद्वान वा धनी झाला अशीही परिस्थिती नव्हती. येऊनजाऊन भिक्षुकीची विद्या. एखादी तात्काळ पोटापाण्याची व्यवस्था करू शकणार नाही अशी कला शिकून त्यात पारंगत होणे याला समर्पण वृत्ती लागते. ती ज्यांनी दाखवली त्यात त्यांना कौशल्य प्राप्त होते हे साधे गणित आहे. जिथे बहुसंख्य समाज रोजीरोटीचा मागे लागला होता अशात यात कोण कशाला संस्कृतवर अधिकार वगैरे राखून ठेवणार डोम्बल्याचे.
----
आता गम्मत सांगतो. ५० वर्षांनी हा प्रश्न ज्या मानसिकतेतून विचारलाय त्यांचीच पुढची पिढी पुढील प्रश्न विचारेल. "जर्मन, जॅपनीज, फ्रेंच भाषांवर केवळ ब्राह्मणांचाच अधिकार का राखून ठेवला गेला?" आता बोला.
----
पुण्यात विद्यापीठाच्या परदेशी भाषा विभागाची रानडे इन्स्टिट्यूट आहे. जर्मन, जॅपनीज, फ्रेंच, स्पॅनिश आणि रशियन भाषा शिकवल्या जातात. फी पाहिली तर चणे फुटाणे वाटतील एवढी स्वस्त आहे. आणि शिक्षकांची गुणवत्ता उत्तम आहे. ब्राह्मण आणि इतर खुल्या प्रवर्गातील मुला मुलींना (आणि स्त्री पुरुषांना, कारण माझ्या माहितीप्रमाणे वयाची अट नाही) गुणवत्ता यादीत लागतात तेवढे गुण लागतात प्रवेश घ्यायला. आणि इतर आरक्षित वर्गांना अगदी पास होतील इतपत असतील तरी प्रवेश मिळतो. आता अशा वेळी आरक्षित वर्गाच्या उड्या पडायला हव्यात ना. पण बघायला गेले तर बहुसंख्य ब्राह्मण घरातील मुली मुलेच जास्त दिसतील. जेव्हा मी तिथे होतो तेव्हा तरी हि परिस्थिती होती. सध्याचे माहित नाही.
यांच्या प्रवेश याद्या ओपन डोमेन आहेत. जरा नावांवरून नजर फिरवली तरी कल्पना येईन. आणि वरच्या लेव्हल च्या लिस्ट पहा. (जसे जसे लेव्हल वाढते, काठिण्य पातळी वाढते आणि हौषे नवशे गळून जातात). फरक स्वच्छ समजतो. जर्मन तरी पोटापाण्याची भाषा आहे; जरा आडबाजुची फ्रेंच, स्पॅनिश आणि रशियन जर पाहिली तर परिस्थितीचा अंदाज येईल. इथेही भूतकाळात जगणाऱ्या लोकांना काहीतरी काळबेरंच दिसणार.
----
भाषा शिकणे हे काही १-२ महिन्याची गोष्ट नाही. कमीत कमी ५-६ वर्षे चांगला सराव लागतो आणि त्यांनंतर संधींची दारे खुली होतात. एवढा संयम दाखवतात त्यांचे कष्ट न दिसता जर फक्त यशाने पोटात गलबल झाली की व्हिक्टीम कार्ड काढायचे. ब्राह्मणेतर मुले या गोष्टी करतच नाही असे म्हणायचे नाही. किंबहुना जी करतात ते असले प्रश्न विचारत चघळत बसत नाहीत. जागतिक संधीचा वेध घेण्यापासून त्यांना उसंतच मिळत नाही. माझ्या अशा ३ ब्राह्मणेतर मित्र मैत्रिणींना या परदेशी भाषांचा कसा फायदा झाला याचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्याबाबत माझ्या आधीच्या उत्तरांमधे उल्लेख आलेला आहे.
संस्कृतभारती |
हे सोडा, आज संस्कृत फुकट शिकायला मिळतिये. वयाची, ठराविक शिक्षणाची अट नाही. संस्कृतभारती नावाची संस्था विनामोबदला हे काम करत आहे. चॅलेंज लावतो इथेही ब्राह्मण विद्यार्थी बहुसंख्य असतील. कारण वेळ घालवायला त्यांना युट्युब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम कमी पडते म्हणून. इथे कोणी कोणाचा अधिकार मारला ते तरी कळूद्या.
Samskrita Bharati
----
ही परिस्थिती सुधारायची असेल तर आम्ही कसे पिचलेले 'होतो', हे जगाला सांगण्याबरोबरच २० टक्के वेळ आपण स्वतः चांगली पुस्तके, भाषा, कला यांचा व्यासंग करण्यात घालवा तेव्हा कुठे मुलांवर तशाच प्रकारचे संस्कार होऊन ५० वर्षांनी असले प्रश्न विचारायची वेळ येणार नाही. आपला व्यासंग जर जयंत्या, पुण्यतिथ्यांच्या मिरवणुकीत "चिमणी उडाली भूर्र, माझा पोपट.." वर डान्स च्या पुढे पोहोचला नाही तर पुढच्या पिढीकडे काय वारसा राहणार?
----
कुणाला दुखावण्याचा हेतू नाही. भूतकाळात चुका झाल्या. समाजामध्ये भेदाभेद होता. आता हे मान्य करून वर्तमानात तरी संधिंकडे डोळेझाक होऊ नये अशी अपेक्षा.
----
मूळ Quora.com वरील उत्तर - https://qr.ae/prVLmt
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!