आजोबांनी गिरवले सत्तरीत संगणकाचे धडे आणि बनले सॉफ्टवेयर डेव्हलपर
सुहास पाटील हे नाव जागतिक विव्दान आणि उद्योजकांमध्ये आदराने घेतले जात असले तरी सर्वसामान्य मराठी घरांमध्ये क्वचितच माहित असेल.
सुहास पाटील यांचा जन्म एका मराठी कुटुंबात जमशेदपूर येथे १९४४ मध्ये झाला. वडील श्रीकृष्ण पाटील हे टिस्को (टाटा स्टील) मधील अभियंते. छोट्या सुहास ला वडिलांच्या प्रतिभेचा वारसा होता. सुहासने स्वतंत्र भारतात नव्याने स्थापन झालेल्या भारतीय प्राद्योगिकी संस्थान म्हणजे आयआयटी मधून पदवी मिळवून अमेरिकेच्या प्रथितयश एमआयटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. १९७० साली पीएचडी मिळवळी. त्यांनी १९८१ साली अमेरिकेच्या सॉल्ट लेक सिटी या शहरात पाटील सिस्टिम्स नावाची संगणकाचे सुटे भाग बनवणारी कंपनी काढली. आज ही कंपनी सिरस लॉजिक (Cirrus Logic) या नावाने ओळखली जाते. पावणेचार हजारापेक्षा जास्त पेटंट्स मिळवलेली हि कंपनी सिलिकॉन व्हॅलीतील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे.
अशा या कर्तबगार सुहास चे वडील - श्रीकृष्ण पाटील हे आपल्या मुलासोबत राहण्यासाठी सत्तरच्या दशकात अमेरिकेत गेले. स्वतःच्या रेडिओ दुरुस्त करण्याच्या छंदाला आणखी पुढे नेत आपल्या लेकाच्या या घरी संगणक पहिल्यांदा शिकले. ज्या देशात पूर्ण आयुष्य काढले तो सोडून विदेशात आल्यानंतरचे एकाकीपण याचा जास्त बागुलबुवा न करता आजोबांनी नवीन गोष्टी आत्मसात करायचा धडाकाच लावला.
आपला मुलगा जागतिक दर्जाची कंपनी उभी करण्यात व्यस्त असताना विशीतल्या तरुणाला समजायला अवघड अशा प्रोग्रामिंग लँग्वेजेसच्या पुस्तकांचा फडशा पाडून मजल दरमजल करत या सत्तरीतल्या आजोबांनी संगणकावर देवनागरी फॉन्ट्स टाईप करण्यासाठी प्रणाली लिहून काढली. ती स्वतःपुरती न ठेवता अमेरिकेतल्या आपल्या मराठी समुदायामध्ये विनामूल्य वाटली. आपल्या मुलाच्या कंपनीसाठी अकॉउंटिंग ची प्रणाली देखील तयार केली.
कर्तबगार मुलगा तसा कर्तबगार पिता तसा कर्तबगार नातू.श्रीकृष्ण पाटील यांचे नातू धनुर्जय DJ पाटील हे देखील अमेरिकेतल्या विद्वान मंडळींपैकी एक आहे. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना स्थापन झालेल्या "युनायटेड स्टेट्स ऑफिस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी" या विभागात ते मुख्य डेटा सायंटिस्ट या पदावर होते.
पाटील कुटुंब हे अमेरिकेतील कर्तबगार मराठी समुदायाचे उत्तम उदाहरण आहे.
_*_
संदर्भ - विकिपीडिया , अपर्णा वेलणकरांचे मराठी पुस्तक - "फॉर हियर ऑर टू गो"
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!