दे दणका 'फोर्स' !
इंटरवललाच मनाचा हिय्या करून बाहेर निघालो. (आईंग??)
मल्टीप्लेक्स मध्ये तिकीट, लाह्या, आणि सटरफटर पेय याच्यावर खर्च केल्यावर मधेच बाहेर पडणे लय जीवावर येते. तसा कशामधूनही बाहेर पडायचे मला पहिल्यापासूनच वावडे आहे. अगदी चाळीस मार्कांचा पेपर लिहायचा असला तरी मी बाकी दीड-दोन तास कोऱ्या उत्तरपत्रिकेकडे बघत काढलेले दिवसपण आठवतात. त्यामुळे सजीत (माझा सदनिकामित्र) ने जेव्हा हा सोडून देण्याचा विचार माझ्या डोक्यात पेरला तेव्हा लय बोर झाले.
आता मी इंटरवल पासून न बघण्यामागचे कारण सांगतो.. हा पिक्चर इतका वाईट मुळीच वाटला नव्हता. पण, सजीत ने तमिळमध्ये याचा मूळ सिनेमा 'काखा काखा' पहिला होता. या इसमाला म्यानर्स नाहीत, मला आधीच सांगितले की जेनेलिया मरते म्हणे. हिरॉईन मरते? गझनी त्यासाठीच पाहिला नाही मी थेटरात. विश्वास नाही बसणार पण गझनी मी तीन वेळा पहिला नंतर.. पाहिला म्हंजे मला बळच दाखवण्यात आला. पळायची सोय नाही, दारे बंद. कान-डोळे बंद करायची सोय नाही, अवघडलेल्या स्थितीत आणि चार माणसांसमोर तसे करणे बरे नाही वाटत. हो, दोनदा पुणे-मुंबई-पुणे, आणि एकदा उटी-मैसूर प्रवासात बसमध्ये दाखवला त्या क्रूर कंडक्टरने.
तर आम्ही बाहेर आलो, हह्ये पाऊस चालू. मग काय करायचे विचारले तर सजीत म्हणे, सूर्या-ज्योतिका (मूळ 'काखा काखा' मधली जोडी) समोर पिल्लू आहेत हे जेनेलिया आणि जॉन. ऐकून घेतले, आणि परत गेलो. पूर्ण पाहिला. आता हा पिक्चर का पाहावा आणि का पाहू नये.. ते..
पिक्चर सुरु होतो गझनी स्टाईल ने. नार्कोटिक्स डीपार्टमेंटच्या ए.सी.पी. यशवर्धन (जॉन) ला एवढी उर्जा आणि चीड (सभ्य भाषेत 'माज') कुठून आलीये याचा पत्ता लागत नाही. दे दणादण एका मागून एक बापुड्या गुंडांना धोपाटतो. बापुडेच ते, कारण त्यांनी अस्सा काय गुन्हा केला हे सांगायच्या भानगडीत दिग्दर्शक पडत नाही. गोळीबार आणि एन्काउंटर तर अगदीच बालिश वाटतात.
या मारामारीत ती झुळूक येते.. जेनेलिया.. आणि मग तिच्यासोबतचे काही प्रसंग चांगले जमून आलेत. जॉन 'अवाढव्य' आहे. आणि तो या सिनेमाचा सेलिंग फॅक्टर नक्कीच आहे. काही संवाद खरच हसवतात. बरीचशी इतर पात्र मराठी आहेत. जेनेलिया चे पात्र मराठी आहे. हो, तसे उघड-उघड नाही दाखवले, पण या जोडीचे लग्न मराठी इश्टाईल ने होते. (या लग्नाच्या सीनवर वाद झालं म्हणे, भटजीने खरे खरे लग्न लावले अशी हवा आहे).
सिनेमाचा दिग्दर्शक- निशिकांत कामत ला आपण ओळखतो ते 'मुंबई मेरी जान' आणि 'डोम्बिवली फास्ट' साठी. खरेतर मला 'मुंबई मेरी जान' 'डोम्बिवली फास्ट' पेक्षा खुपच उजवा वाटतो. हे सिनेमे पाहिल्यानंतर मला जेव्हा समजले, की हाच तो 'सातच्या आत घरात' मधला बदक, तेव्हा विश्वास बसला नाही. नंतर मी '४०४:एरर नॉट फाउंड' अशा विचित्र नावाच्या ठीकठाक सिनेमात याला पाहिले. 'मुंबई मेरी जान' ज्यांनी पाहिलाय, त्यांना 'फोर्स' कडून अपेक्षापूर्तीची जाणीव नाही येणार.
आता विलन, डाकू, खलनायक, अँटॅगनिस्ट, हीरोचा नेमेसिस विषयी..
केवळ अफलातून. विद्युत जमवाल अशा इलेक्ट्रीफायिंग नावाच्या पोराने साकारलाय 'विष्णू'. ए.सी.पी. यशवर्धन चा माज कम्प्लीट उतरवणारा.
"मेरा काम था ड्रग्स बेचना, तेरी ड्युटी थी मुझे रोकना. तेरा काम था अण्णा को पकडना, मेरा काम था उसे कैसेभी जेल से निकालना.. बट देन यू डीसायडेड टू प्ले गॉड" अशा आशयाचा एक खतरनाक डायलॉग टाकून हिरोला गप्प करणारा खलनायक चांगला जमलाय. हसू नका, पण मला 'डार्क नाईट' च्या जोकर पेक्षा भयानक वाटला हा.
आणि कौतुक आणखी एका गोष्टीचे की याने त्याचे स्टंटसीन असेकाही केलेत, की तोंडात बोटे घालावीत. ही युट्युब ची लिंक पहा.. सर्व मीडिया समोर त्याने प्रत्यक्ष केलेत..केबल्स न वापरता.. मानलं याला.
स्टोरी लय ट्रॅजिक आहे, गझनी सारखी.. नाहीतर कुणी सांगावं..आणखी एकदा बघितला असता..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!