द बिग बँग थियरी: शास्त्रज्ञांतल्या माणसांचे जग-२



आमचे परममित्र हेमचंद्ररावजी साहेब, हे दोन वर्षांपूर्वी अमेरिकेला गेले खरे, पण जेव्हा परत आले तेव्हा कंपनीने त्यांना (एकटेच) हनिमूनला पाठवले होते की काय, असा प्रश्न पडला. दोन महिन्यात पश्चिम अमेरीकेतली बरीचशी लोकप्रिय पर्यटन स्थळे फिरले आणि तिथे त्यांचे ढीगभर ट्रेडमार्क पोझ मधले फोटो काढून आणले. येताना मित्रांसाठी चॉकलेटं आणि तिथल्या द्रुतगती इंटरनेटचा वापर करून संग्रहित केलेले पिक्चर आणि मालिकांचे ऋतूचे ऋतू घेवून आले. हेमंत.. जाहीर आभार.
या संग्रहामध्ये हा फोल्डर होता The Big Bang Theory नावाचा. म्हटले असेल नॅट जिओ, नाहीतर डिस्कवरी ची डॉक्युमेंटरी. एक दिवस असाच माझ्यातला स्युडो-सायंटीस्ट जागा झाला आणि म्हटले बघूया तरी, कळले तर कळले नाहीतर उद्या उठून कोड-फोड आहेच. आणि अशी सापडली माझी सर्वात आवडती सिटकॉम.

----


शेल्डन कूपर हे मालिकेचे मध्यवर्ती पात्र. हा शेल्डन आहे दैवी प्रतिभा लाभलेला सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ. त्याच्या जगात आहे त्याचा रूम-पार्टनर लेनर्ड हॉफस्टेडर आणि त्याचे आणि नाईलाजाने शेल्डन चे झालेले मित्र हॉवर्ड वोलोवित्झ आणि राज कुथ्रपल्ली. लेनर्ड हा प्रायोगिक भौतिक शास्त्रज्ञ तर राज खगोलशास्त्रज्ञ, आणि हॉवर्ड हा एम.आय.टी. मधून पदवी मिळवलेला 'फक्त' अभियंता. हॉवर्ड जगातल्या सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या विद्यापीठातून जरी शिकला असला तरी पीएचडी धारक नसल्याने शेल्डन चा राखीव मित्र आहे. हे सारे कॅलटेक मध्ये संशोधन आणि कधीतरी व्याख्याता म्हणून काम करतायेत. या सर्वांचे जगच वेगळे. त्यांच्या या ग्रुपमध्ये पेनी आहे. २२-२४ वर्षांची कधी व्यवहारी कधी स्वप्नाळू मुलगी. शेल्डन हा म्याटर असेल तर हि अॅन्टीम्याटर.

शेल्डन
ने वयाच्या सोळाव्या वर्षी त्याच्या दोन पीएचडयांपैकी पहिली पीएचडी मिळवली. आय.क्यू. १८७. लहानपणी बहिणीची मांजर घरी बनवलेल्या CAT स्कॅनर मध्ये जाळली, तर घरी अणुभट्टी बनवण्यासाठी संपृक्त युरेनियम इंटरनेट वर शोधत होता म्हणून पोलीसांनी एकदा पकडलेले. त्याच्या चारचौघींसारख्या धार्मिक आईचा, 'आपल्या मुलाच्या बुद्धिमत्तेचा आपल्या घराशी काही संबध नाही.. आणि ती चक्क जिझस कडून त्याला मिळालीये', असा प्रामाणिक समज आहे. शेल्डनला बाकीची पोरं किती मूर्ख आहेत हे बघून रडू यायचे. असा स्वभाव असलेल्या मुलाला शेजारची टगी पोरं बदडून काढणार हे आलेच. त्यामुळे आपण या युगात चुकून जन्माला आलो आणि आपल्याएवढीच प्रगत जमात भविष्यातून येवून आपल्याला घेवून जाईन, अशी त्याला आशा होती. त्याचा आदर्श, स्टार ट्रेकचा 'स्पॉक' त्याला भविष्यात घेवून जाण्यासाठी आलाय अशी एकपात्री नाटुकली करायचा, पण नाटकात देखील आईला सोडून जाण्याची वेळ येई तेव्हा तो अजुनही लहान मुलासारखा रडतो. त्याला जेर्मोफोबिया आहे, एखादी खूप साधी गोष्ट अती विश्लेषण केल्यामुळे किचकट करतो, आणि ३० वर्षांचा असूनही सायंस सोडून कुठेही लहान मुलासारखा वागतो म्हणून त्याला लोकांना सांगावे लागते "I am not crazy, my mother had me tested".


लेनर्ड, त्या मानाने खूपच माणसात आहे. उच्च शिक्षित आईवडिलांचे तिसरे अपत्य. लेनर्ड ची आई मानसशात्रज्ञ आहे. आणि वडील पण वैद्यक शास्त्रज्ञ. घरी नेहमीच अभ्यासू वातावरण, ख्रिसमस ला शास्त्रीय लेखांचे वाचन, वाढदिवस साजरा करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आणि नेहमी भावंडांशी स्पर्धा अशा वातावरणात बालपणी प्रेम नाही मिळाले. लेनर्ड ने त्याला कवेत घेवून थोपटणारा रोबॉट बनवला होता. त्याच्या आठवणीनुसार त्याचे बाबा या रोबॉटला कधीकधी त्याच्याकडून उधार घ्यायचे. लेनर्ड चा ओढा हा प्रेम आणि तद्वत भावनांकडे आहे, ज्या शेल्डन च्या दृष्टीने टाकाऊ आहेत. शेल्डन च्या उपदेश देण्याच्या स्वभावामुळे या दोघामध्ये नेहमी या कारणावरून लढाई जुंपत असते.


हॉवर्ड हा बेताची उंची आणि शरीरयष्टी असलेला. नासाच्या ISS, आणि इतर खगोलीय मिशन्स साठी उपकरणे बनवणे हे त्याचे काम. पोरींच्याबाबतीत जरा जास्तच लाळघोटेपणा. त्याला पाच भाषा बोलता येतात. साईन लँगवेज हि येते. या ज्ञानाचा वापर पोरींवर इम्प्रेशन मारण्यापलीकडे करत नाही. आईसोबत राहणारा, स्वतंत्र राहायची नुसतीच स्वप्ने बघणारा. तिसऱ्या सिझनमध्ये कायमस्वरूपी मैत्रीण - बर्नाडेट मिळेपर्यंत या इम्प्रेशन पाई त्याने मार्स-रोवर एका मुलीला चालवायला दिले आणि मंगळावरच्या एका खड्ड्यात पाडले. नंतर त्याच खड्ड्यात नासाला पाणी मिळते, म्हणून स्वारी वाचून जाते.


राज.. हा दिल्लीचा. गर्भश्रीमंत, वडील गायनॅक. राज वर्कविसा वर अमेरिकेत आहे. भारतात फार गर्दी आहे आणि हॅम्बर्गर मिळत नाही या कारणासाठी त्याला अमेरिका सोडायची नाही. कुठल्याशा ट्रांस-नेप्चुनिअन लघुग्रहाचा शोध लावला, आणि त्याच पुण्याईवर आणखी सहा महिने फ़क़्त विकी वाचणे आणि फेसबुक स्टेटस अपडेट करणे यात टाईमपास केला. हॉवर्ड चा हा परम मित्र. हॉवर्डच्या सल्ल्यानुसार वागून कधी कधी संकट ओढवून घेतो. याची सर्वात विनोदी वृत्ती म्हणजे त्याला मुलींशी बोलता येत नाही. बोलता येत नाही म्हणजे वाचाच जाते. जर मुलीसमोर काही बोलायचे असेल तर हॉवर्ड च्या कानात कुजबुजतो. जर दारूच्या अंमलाखाली असेल तर मात्र कॅसानोवा होतो याचा. हॉवर्ड ला त्याचा या बाबतीत हेवा वाटतो.


पेनी राहते शेल्डन-लेनर्ड च्या समोरच्या फ्लॅट मध्ये. नेब्रास्कामधून एका रांगड्या परिवारातून आलेली पेनी अभिनेत्री होण्याची स्वप्ने पाहते. ऑडिशन देणे आणि निर्वाहासाठी चिस-केक फॅक्टरी या रेस्तरां मध्ये काम करणे, याशिवाय शेल्डन ची जिरवणे हा तिचा मुख्य उद्योग. पहिले तीन सिझन लेनर्ड तिच्या प्रेमात पडतो. तसे लेनर्ड ला कोणतीही मुलगी दिसली कि प्रेमात पडण्याची सवय. या ग्रुपला ताळ्यावर आणण्याचे काम बऱ्याचदा करते. तसे तिलाही तिच्या अडचणी आहेतच. बॉयफ्रेंड ने दगा दिला, सिनेमात नाही तर एखाद्या जाहिरातीत तरी काम मिळावे, भाडे देण्यासाठी पैसे नाहीत असे. शेल्डन-लेनर्ड पण मदत करतात तिची.

शेल्डन, राज, लेनर्ड आणि हॉवर्ड मध्ये काही समान दुवे आहेत. हे सगळे कॉमिक्स चे कट्टर फॅन. मार्वल कॉमिक्सचा स्टॅन ली हे त्यांचे दैवत. सगळे गेमाडपंथी.. निंटेन्डो पासून पीएस३ पर्यंत कन्सोल संग्रहात आणि सुपर-मरिओ पासून क्वेक,वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट पर्यंत सगळे गेम वार लावून खेळणे, खेळणी बनवणे, इंटरनेटवर बसून चाळे करणे, इंडियाना जोन्स, स्टार ट्रेक, स्टार वॉर्स, सगळे सुपरहिरोंचे सिनेमे एका बैठकीत पाहणे. कुठल्याही फुटकळ गोष्टींवर पैजा लावणे हे त्यांचे वेळ घालवण्याचे उद्योग.

बिग बँग एका बाबतीत भलतीच वेगळी आहे ती म्हणजे सायंस चा विनोदनिर्मिती साठी केलेला वापर. श्रोडिंगर चे मांजर, मादाम क्युरींचा रेडीयम चा शोध आणि त्याच्यामुळे झालेला मृत्यू, स्ट्रिंग थियरी मध्ये आलेली कोंडी, सापेक्षता, कालप्रवास असे सर्वसाधारण परिचयाचे आणि बरेच किचकट विषय सुद्धा खुपदा विनोदासाठी वापरलेत. या मालिकेचे शास्त्रीय संवाद खऱ्याखुऱ्या शास्त्रज्ञांकडून आधी तपासून घेतात म्हणे. नेपथ्यात वापरलेले व्हाईट बोर्ड दर वेळी नवीन लिहून घेतले जातात आणि त्यावर खरेखुरी समीकरणे पेरली जातात. शेल्डन च्या संवादामध्ये बऱ्याचदा फिसिक्स बरोबर इतिहास, संस्कृती, भाषा, सिनेमा यांचे संदर्भ येतात. बहुतेक वेळा एपिसोड संपला कि विकी मारावी लागते. चवथ्या सीझन मध्ये शेल्डनला मिळालेली मैत्रीण एमी हि न्युरोसायन्स मधून पीएचडी आहे.. खऱ्या आयुष्यातही.

अशा मालिकेची भुरळ शात्रज्ञांना पण पडली यात नवल काय? नोबेल मिळालेले भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज स्मूट हे स्वत:हून एका भागात पाहुणे म्हणून आले. आणि बऱ्याच भागांत अजूनही काही शास्त्रज्ञ येवून गेलेत.

एकूणच धमाल उडवून दिलीये काही अतिशय मेहनती नाही म्हणणार.. पॅशनेट आणि हुषार लोकांनी मिळून, असेल वेळ तर पाहायला करा सुरुवात. :)

टिप्पण्या

  1. धन्यवाद पाटील ...
    बाकी मालिकांविषयी लिहा जरा आमचा त्याबाबत फार अज्ञान आहे :-)

    उत्तर द्याहटवा
  2. मस्त लेख. मी या मालिकेचे फारच थोडे भाग पाहिले आहेत. आणि सध्या टिव्ही कटप केल्यामुळे कोणतीच मालिका बघत नाहीये. यातील एका पात्राच्या नामसाधर्म्यामुळे काही अमरू मित्रांनीही ही मालिका बघतो स का असे विचारले होते. :)
    सायन्स आणि विनोद यांचा संगम फार क्वचित दिसून येतो. उदा. हिचहायकर्स गाइड.

    उत्तर द्याहटवा
  3. हेमचंद्र,
    तुमच्याच संग्रहातून आलेले 'हाऊ आय मेट युवर मदर' पण ५ व्या सिझन पर्यंत पाहून झाले आहे. त्यामुळे सुचेल तसे लिवतो.

    राज,
    प्रतिसादाबद्दल आभार.. नावाबरोबरच भौतिकशास्त्र, पीएचडी आणि विनोद हे पण फ्याक्टर समान आहेत :)
    'हिचहायकर्स गाइड' बद्दल माहित नव्हते. विकी म्हणते कि रेडिओ सीरिस, पुस्तके आणि टीवी अशा सगळ्या माध्यमात आहे ते. तुम्ही कोणत्या संदर्भात म्हणताय ते सांगितले तर बरे होईल. Random Thoughts वर यासंदर्भात एखादी पोस्ट असेल का?

    उत्तर द्याहटवा
  4. व्वा !! आशिष जमलंय तूला !! भारी लिहिलंयस :-)

    ( "माझे अजून दोन एक्के...." या श्टाईलमध्ये - पेनीच्या वडिलांच्या तिच्याकडून असणाऱ्या अपेक्षा लिहू शकला असतास तू ! ;-) फक्त गंमत रे... तुझं हे सगळं लिखाण मी वाचलंय याचा पुरावा म्हणून ही टिपणी... हाहाहा... )

    हे सगळं लिहिण्यासाठी तू ही मालिका किती वेळा पाहिली असशील आणि इंटरनेटवर याचे किती फोरम वाचले असतील त्याची कल्पना करू शकतो आम्ही... वेड... चालू द्या... :-D :-D

    बाकी.. मी चौथा ऋतू मिळण्याची वाट पाहतोय.... ;-)

    उत्तर द्याहटवा
  5. आशिष,
    हिचहायकरचे पुस्तक सर्वात चांगले आहे. सिनेमा ठीक आहे, मालिका मला आवडली नाही. आणि रेडिओ मालिका कधी ऐकली नाही. यावर पोस्ट नाही लिहीले अजूनतरी. :)

    उत्तर द्याहटवा
  6. @निखिल
    प्रतिक्रिया बघून आनंद झाला. चौथा ऋतू आहे माझ्याकडे आणि पाचवा सध्या चालू आहे त्यामुळे जसे एपिसोड झाले कि डाउनलोड करतोय.

    @राज
    तुमची हि प्रतिक्रिया येईपर्यंत कूर्मगती टोरेंट वरून ४.५ गीबा चा पिक्चर डाउनलोड केला पण. उम्म..हं नाही.. पुस्तकच घेतो आता.

    उत्तर द्याहटवा
  7. अरे, हे सांगायचे तर राहूनच गेले.
    या मालिकेतल्या प्रत्येक एपिसोड मधल्या शास्त्रीय संवादांचे विश्लेषण करणारा ब्लॉग आहे.
    http://thebigblogtheory.wordpress.com/2011/03/

    उत्तर द्याहटवा
  8. Hi Ashish,Nice blog..!Ek kautukaspad goshta mhanje Marathi khupch shastrashudhha prakarchi waaparli ahe..!!:)Looking forward to start watching the serial after reading the blog...!
    Keep it up..!:)

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्रायासाठी अनेक आभार!

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक