बदलुराम का बदन जमीन के नीचे है
Tue. may 2016
"बदलुराम का बदन" हे ते गाणे. गाण्याच्या ओळी अशा आहेत -
"बदलूराम का बदन जमीन के नीचे है,
बदलूराम का बदन जमीन के नीचे है,
तो हमे उसका राशन मिलता है"
असाम रेजिमेंट चे गाणे आहे हे. या गाण्यामागची कथा थोडी करूण पण गमतीशीर आहे.
दुसर्या महायुद्धात असाम रेजिमेंट बदलूराम नावाचा सैनिक धारातीर्थी पडला होता. पण त्याच्या हुशार क्वार्टर मास्टर ने त्याच्या वाट्याचे रेशन चालूच ठेवले. पुढे जेव्हा कोहीमाला जपान्यांच्या वेढा पडला, त्या वेळी हे जास्तीचे रेशनमुळे ब्रिटीश-भारतीय सैनिकांना आणखी काही दिवस तग धरता आला अशी ती कथा.
खरेतर एका सैनिकाचे रेशन घेवून असा कितीसा फरक पडणार असे वाटू शकते. कदाचित बदलूराम पासून चालू झालेली हि प्रथा त्यांच्या क्वार्टर मास्टर ने आणखी बर्याच मृत सैनिकांसाठी वापरली असावी आणि त्यामुळे त्यांना वेढ्याच्या वेळी तेवढाच फायदा झाला असावा.
वर वर पाहता एका सैनिकाच्या मृत्यूची केलेली टवाळी असे वाटू शकते. परंतू थोडा विचार केल्यावर, या सैनिकाचा उल्लेख रेजिमेंट च्या गाण्यात करून रेजिमेंट ने त्याची स्मृती जपली आहे.
सैन्याच्या पद्धती आणि चालीरीती जरा विचित्रच असतात नाही? भारतीय सैन्याच्या प्रत्येक रेजिमेंट, बटालियन ला जवळ जवळ दीड-दोन शतकांचा इतिहास आहे. त्यात असे कितीतरी प्रसंग.
आसाम रेजिमेंट च्या सैनिकांना त्यांच्या ऱ्हायनोस या टोपणनावाने ओळखतात. या गाण्याच्या चालीवर, कडक युनिफॉर्म परिधान करून, थोडे हास्यास्पद पण तंतोतंत लयबद्ध असे पदलालित्य दाखवत गाणार्या या नवीन सैनिकांचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही.
दुसर्या महायुद्धात ब्रिटीशांच्या अधीन असलेली ही रेजिमेंट, कोहिमा इम्फाळ च्या लढाईत जापान्यांसोबत लढली.
याचा नक्की अभिमान वाटावा की दु:ख? एका बाजूला सुभाष चंद्र बोसांची INA आझाद हिंद सेना जपानची साथ देवून भारतातील ब्रिटीश राजवट उलथवून टाकण्याच्या प्रयत्नात असताना, कोहिमा इंफाळ च्या लढाईपासून त्यांची आणि पर्यायाने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या सैनिकांच्या पराभवाची सुरुवात झाली.
खरेतर INA च्या सैनिकांचे बलिदान वाया गेले नाही. त्यांच्यावरच्या देशद्रोहाच्या खटल्यांनी पूर्ण हिंदुस्तान जाती धर्म विसरून एकत्र झाला, ब्रिटीश भारतीय सैन्यामध्ये बंडाळी उफाळली आणि ब्रिटिशांना भारतावरची सत्ता सोडणे भाग पडले.
पण फाळणी नंतर INA चे काही सैनिक पाकिस्तानी झाले, काश्मीर मध्ये भारताविरुद्ध लढले. वर उल्लेख केलेली आसाम रेजिमेंट सीमा इकडच्या तिकडे झाल्या असत्या तर कदाचित आज बांगलादेशी पण असू शकली असती. रेषांचा खेळ सगळा.
आपला देश म्हणजे खरेच एक चमत्कार आहे. इतिहासात एकमेकांचे बारा वाजवणारे आज मित्र आहेत, खांद्याला खांदा लावून लढणारे कट्टर शत्रू झाले. लहानपणी पडणार्या प्रश्नांची उत्तरे आता मिळतायेत. इतिहास जपून का शिकवला जातो हे आता कळतंय. अभिमान आहे अशा देशाचा ज्याने भविष्याला ओळखून वेळीच आखणी केली. इतिहास जसाच्या तसा शिकवायच्या नादात आज आपण स्वत:चे खूप नुकसान करून घेतले असते. पाकिस्तान चे उदाहरण समोर आहेच.
पण हे डावपेच नाहीत का? इतिहासाची मोडतोड नाही का? असेल. पण जोपर्यंत सर्वांगीण विचार करण्याची कुवत येत नाही तोपर्यंत याला पर्याय नाही. थोडक्यात "वर्तमानात का जगावे?" याचे उत्तर भारतीय सैन्याच्या उदाहराणातून समजते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!