सॉरी नागराज, मी सैराट ऑनलाईन पाहिला


(potential spoilers)

इतकी हाईप केल्यावर दम तरी कसा काढणार? त्यात रोज whatsapp वर काहीना काही नवीन.. "इतका मोठा ससा नववीतच कसा" वगैरे.. आणि सैराटची पूर्ण गाणी युट्युब वर आधीच रिलीज करून झिंग लावण्याची पूर्ण व्यवस्थाच केलेली होती.

मग काय बघितला. इथे पोलंड मध्ये रिलीज होण्याची शक्यता कमीच होती तशीही. पण पुण्यात तिकीट काढलं मी. एका रिकाम्या खुर्चीने माझ्याऐवजी बघितला तो पिच्चर थेटरात. उसूलोका वैसे पक्का हू मय..

मागे बाजीराव मस्तानी च्या वेळी पण असेच कंट्रोल नाही झाले, पण जसा तो ग्राझ मध्ये रिलीज झाला.. मी परत थेटरात जाउन बघितला. ग्राझ मध्ये आला नसता आणि ऑनलाईन पण नसता तर म्युनिच ला जाण्याची पण तयारी केली होती. पण तशी वेळ आली नाही.

बास.. आत्ता सैराट.. फक्त सैराट.

ख त र ना क.. आयच्या गावात.. भन्नाट पिच्चर बनवलाय. नेहमी प्रमाणे म्हंटले असते हॉलीवूड च्या तोडीचा आहे.. पण, कदाचित आता एखादा हॉलीवूड चा पिच्चर सैराट च्या तोडीचा आहे असा उल्लेख करेन मी कधीतरी.

एव्हाना सगळ्यांनी पाहिलाच असेल.. मला एवढा का आवडला? काही नवीन स्टोरी आहे? नाही.. मग?

सैराट ला मातीचा गंध आहे. सल्या परशाला जेव्हा म्हणतो "तुझ्या भल्याचं सांगतो तर तू आमचाच टांगा पलटी करतुया लका", किंवा परशाचे वडील त्याला रागवतात "दिसभर कुठं कुत्री मारत हिंडतया" तिथेच तो मनाशी कनेक्ट होतो. कुठेही कृत्रिमपणा नाही, अवघडलेले डायलॉग्स नाहीत की बळच म्हणून घुसडलेले हौसे नवशे गवशे कलाकार नाहीत.

गाणी.. आणि त्यांचे चित्रण.. अजय अतुल ने त्यांनीच ठेवलेलं माप आणखी उंचावर नेलय. हॉलीवूड च्या सोनी स्टूडीयोत रेकोर्ड केलेली त्यांची "याड लावणारी" सिम्फनी.. आणि तेवढ्याच ताकदीची स्लोमो मध्ये चित्रीत केलेली परशाच्या प्रेमाची वाटचाल. अप्रतिम.

एक मिनिट, पण हे तर एखाद्या तमिळ किंवा मल्याळम सिनेमा मध्ये पण बर्याचदा दाखवलय.. मग आणखी काय असे आहे यात, की हा असा अविस्मरणीय बनावा?

आहे.. २०-३० सेकंदाचे प्रसंग. जे तुकड्या तुकड्यात येतात पण ६ तासाच्या या सिनेमाला ३ तासांचा रमणीय अनुभव बनवतात. नागराज मंजुळेंनी मराठी मनावर खूप उपकार केलेत.. त्यांनी चक्क प्रेक्षकांना विचार आणि तर्क करता येतो, याच्यावर विश्वास ठेवलाय. उदाहरण..

प्रिन्स चे त्याच्या शिक्षकांना मारणे, तात्यांचे त्याच्यावर काहीच न करणे, आणि नंतर परशा समोर त्याच शिक्षकाने अर्ची बद्दल अपमानजनक बोलणे याचा खुप मोठा अर्थ आहे.

अर्ची आणि परशा पळून गेल्यावर, तात्याला त्यांनी फेट्या शिवाय बसून व्यासपीठावर नवीन महिला आमदाराच्या विजयाला पराभूत नजरेने पाहणे, आणि पार्श्वभूमीवर "सावित्रीबाई फुलेंची भूमी" वगैरे भाषणाचा आवाज.
तात्याच्या मनात काय चालले असेल, अर्चीबाद्दलची स्वप्ने, आणि स्वत:च्या राजकीय कारकीर्दीचा झालेला अस्त.

आर्ची च्या मागे बाळाला घेवून जाताना "संस्कृतीरक्षकांनी" प्रेमी जोडप्यांना मारहाण करताना परशाने स्तिमित नजरेने पाहणे.

शेवटच्या प्रसंगात आर्चीचे काका आणि प्रिन्स घरात त्यांचा अल्बम बघतात. कुठून कुठपर्यंत झालेला या जोडीचा प्रवास याची पूर्ण कल्पना घेतात आणि तरीही..

चित्रपटात जातीव्यवस्थेवर कुठेही थेट भाष्य केलेले नाही.. तरी त्याचा पूर्ण परिणाम येतो.  गाणी सिनेमाचा वेग कमी न करता उलट भन्नाट वाढवतात. झिंगाट सोडले तर प्रत्येक गाण्यामधून स्टोरी खूप वेगाने पुढे सरकते.
शेवटच्या प्रसंगात बाळाच्या पायाच्या ठशाबरोबर एक जखम मनावर सोडून हा सिनेमा संपतो.

खूप प्रश्न उसळतात.. चीड येते.. मोठ्या कष्टाने सावरलेले एक खोपटे क्षणात उद्ध्वस्त झालेले असते. पण मग आर्ची आणि परशाने तरी काय केले.. आई वडिलांची खोपटी तर त्यांनीही उधळून लावली. आणखी कोणत्या प्रकारे त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले असते? कोणाचे कुठे चुकले? अशी हुरहूर मागे लागते.

जाती बरोबरच गरीब-श्रीमंत भेद करणारे, समाजात स्थान जपण्यासाठी प्रस्थ तयार करणारे आणि मग त्या वाढवलेल्या अहंकाराला जपण्यासाठी कुठल्याही थराला जाणारे लोक आज सगळीकडे आहेत. अशा या वातावरणात आर्ची-परशाचे उस्फूर्त प्रेम एकतर टिकणार नाही किंवा असेच चिरडले जाईल.

आपल्या समाजात आज गरज आहे ती हा माजोरडेपणा संपवण्याची. माझी जात वरची, किंवा मी श्रीमंत किंवा मी पुढारी म्हणून तूझी किंमत कमी.. हाच सर्वात मोठा रोग आहे आपल्या समाजाला. जातीभेद आणि रंगभेदापेक्षाही हा माजोरडेपणा जास्त घातक. यावर उपाय? एक भेद संपवला तर माणूस दुसरा भेद उभा करतो. संपूर्ण मानवजातीला मिळालेला शापच तो.

नागराज मंजुळेंंचा फ्यान झालो. परशा, सलीम, प्रदीप, अर्चना, हैद्राबाद ची मावशी ची पात्र त्यांनी खूप विचारपूर्वक बनवलीयेत आणि कलाकारांनी पण त्यांना तेवढीच चांगली साथ दिलीये. करमाळ्याच्या परिसरात चित्रण करून त्यांनी आपल्या गावाला एकप्रकारची अमरत्वाची भेट दिलीये.

"सैराट झालं जी.."



टिप्पण्या

  1. As always.. great analysis of the subject- Sairat, in this case.

    I would also like to point out some positive things from the movie. Such as, Archie adjusting to the hostile environment for her. Maturity shown by Parshya. When misunderstandings happened, they fought, but stayed together. Possessiveness of Parshya is a form of love he shown for Archie. He realises his mistake afterwards. And just before the last scene, the love of husband for his wife is shown, when she tells him to take Tea for her relatives and he obliges. This is what a respect should be between husband and wife.

    There was also a scene, when a phone-call is going on between Archie and her mother, Pradeep is calling. Nagraj has shown that the friends are still on touch.

    Great Movie ! Great Direction! in a very long time..

    Feels like watching it again.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हो रे.. हा पिच्चर इतक्या विषयांना स्पर्श करतो की असे सुंदर प्रसंग नकळत गृहीत धरले जातात..

      हटवा
  2. पण पुण्यात तिकीट काढलं मी. एका रिकाम्या खुर्चीने माझ्याऐवजी बघितला तो पिच्चर थेटरात. उसूलोका वैसे पक्का हू मय..>>
    Bravo. Baki picturebaddal kay bolayache? speechless.

    उत्तर द्याहटवा
  3. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. Movie baghtana jya goshtincha evdha vichar navata kela tya goshtincha vichar blog vachlyanantar kela..
    Online movie baghun punyat ticket kadhan..only you can do this...

    उत्तर द्याहटवा
  5. Movie baghtana jya goshtincha evdha vichar navata kela tya goshtincha vichar blog vachlyanantar kela..
    Online movie baghun punyat ticket kadhan..only you can do this...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्रायासाठी अनेक आभार!

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक