परोपकार की स्वउपकार?



तुम्ही अशी कोणती गोष्ट परोपकार म्हणून केली पण त्याचा तुम्हालाच प्रत्यक्ष फायदा झाला?

साधारण २००८ च्या दरम्यान मी एकदा वृत्तपत्रात एक लेख वाचला. त्यात लेखकाने त्यांचा अनुभव कथन केला होता. सामसूम रस्त्यात त्यांचे पेट्रोल संपले आणि एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने स्वतःच्या दुचाकीतील पेट्रोल देऊन लेखकाला मदत केली. जेव्हा लेखक त्या स्वाराला पैसे देऊ लागला तेव्हा त्याने पैसे स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. ते म्हणाले की मोबदला द्यायचाच असेल तर लेखकाने देखील आपल्याबरोबर पाईपचा तुकडा ठेवावा आणि इतर बाईकस्वारांना अडीनडीला मदत करावी.


मला ही कल्पना चांगलीच आवडली. मी माझ्या शहरात असे बाइक ढकलणारे लोक बरयाचदा पाहिले होते. माझ्या ऑफिस व घरामधील रस्त्यात 5-6 किलोमीटरच्या परिसरात पेट्रोल पंपच नव्हता. त्या मार्गावर,अशी दृश्ये जवळपास प्रत्येक आठवड्यात दिसायची. मी स्वतःला या अडचणीत एकदा दोनदा सापडलो होतो.चला, एक चांगले पुण्याचे काम करूया या भावनेने मी माझ्या ऑफिस बॅगमध्ये एक सायफन नळी आणि एक छोटी प्लास्टिकची बाटली ठेवण्यास सुरुवात केली.

गाडी ढकलून बेजार झालेले, थकलेले, स्वतःला दोष देत चाललेल्या दुचाकी स्वारांचा त्रास माझ्या या पेट्रोल दानाने दूर व्हायचा आणि यातून मलाही एक आत्मिक समाधान मिळत होते.

नंतरच्या काळात नवीन बाईक्समध्ये आलेल्या पेट्रोल पातळी दाखवणाऱ्या काट्यांमुळे म्हणा किंवा शहरात पेट्रोल पंपांच्या वाढत्या संख्येमुळे म्हणा,अशी दुचाकीला धक्का मारणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली.

गमतीचा भाग असा की मी हा उद्योग सुरु केला तेव्हापासून माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये पुरेसे पेट्रोल आहे कि नाही याबाबत मी आणखी सजग झालो. त्यामुळे झाले असे की मला दुसऱ्यांना मदत करण्यास अडचण तर आली नाहीच आणि मीसुद्धा पेट्रोल संल्यामुळे दुचाकी ढकलतोय असे परत घडले नाही. अशा प्रकारे परोपकार म्हणून केलेल्या गोष्टीने माझेच भले केले होते.

आता विचार करताना असे वाटते की आपण जर एखाद्याची मदत करण्याच्या उद्देषाने साधन संपत्ती जमा करत असल्यास, आपण स्वत:साठी आणि इतरांसाठी पुरेशी संपत्ती जमवण्याचे सुनिश्चित करतो आणि त्यादृष्टीने योजनादेखील करतो. यामुळे आपले आयुष्यही चांगले होते.

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक