लग्न पहा 'बे' करून
सध्या लग्न जुळवणे कठीण का होत चालले आहे?
मी लग्नाच्या वयाचा झालो असताना, म्हणजे साधारण सव्वीसाव्या वर्षी यावर गहन विचार केला होता. गहन विचार करणे हा स्थायीभाव असल्याने, लग्न जुळण्याच्या काठिण्यपातळीत वाढच झाली होती.
तर हे त्या वेळेचे विचार मी माझ्या ब्लॉग पोस्ट मध्येसविस्तर पणे मांडले आहेत[1]. इथे ते आणि आणखी काही मुद्दे सांगतो -
१. माणसाचे वाढलेले आयुष्यमान आणि त्यात आलेले सातत्य हे लग्नाला होणाऱ्या वाढत्या विरोधाचे कारण असावे. पूर्वी आयुष्य म्हणजे कधी काय होईल याचा भरवसा नाही, आज याला डायनोसॉरस ने खाल्ले उद्या त्याला म्यामथ ने तुडवले अशा पद्धतीचे. शिकार करा आणि खा. आज शिकार मिळाली तर दिवस कारणी, आज जंगलातून येवून जगलो वाचलो तर उद्याचे पाहू अशी जीवनशैली. त्यामुळे जोडीदार कसा मिळावा याच्या अपेक्षा जेमतेमच. कारण उद्या ती आहे की मी नाही कुणाला माहिती? आज म्हणजे लग्न केलं की पुढची ५०-६० वर्षे या व्यक्तीबरोबर काढायची म्हंटल्यावर तथाकथित वाढलेली बौद्धिकपातळी 'तिसरा म्याट्रीक्स' पाहताना जशी कावरीबावरी होते तशी होते. त्यामुळे जोडीदार मिळवणं (लग्नासाठी) हा अवघड आणि नावडता प्रकार आहे याबद्दल कुणाचे दुमत नसावे.
२. मुलींचे शिक्षण, नोकरी व्यवसायामध्ये वाढलेल्या संधी या समाजासाठी चांगल्या गोष्टी आहेत. त्यातून समाज अधिकाधिक प्रगल्भ आणि समृद्ध होत आहे. याचाच अर्थ असा आहे की अधिकाधिक मुली पुरुषांच्या बरोबरीने अर्थार्जन करीत आहेत. पण पुरुषप्रधान संस्कृती अजूनही वरातीमागून घोडे आणत आहे. मुलींना आपला जोडीदार त्यांच्यापेक्षा सरस हवा असणे ही त्याच समाजाची मानसिकता आहे. आता विचार करा की अशा मुली जर २५ साव्या वर्षी लग्नाला निघाल्या तर त्यांना अपेक्षित असलेली उत्पन्न, हुद्दा, अमेरिकावारी असलेल्या मुलाचे वय २७-२८ कसे असेल? तो तर तिशीच्या पुढे निघाला.
३. जुन्या पिढीमधील गोंधळ - वरील मुलीला मनाजोगते स्थळ सांगून आले देखील. पण वरातीमागून घोडे आणणाऱ्या समाजातील त्याच्या आईवडिलांना मुलीला स्वैपाकपाणी यायला हवे, ऑफिसला जाण्याआधी आणि आल्यानंतर घरातले सगळे करायला पाहिजे, पाहुण्या रावळ्यांची उठबस केली पाहिजे या अपेक्षा असतील (आणि त्यांनी जर बोलून दाखवल्या) तर पोहे खाऊन निघा.
४. निवड अर्धांगवायू (गूगल ने सुचवलेले Choice Paralysis चा अनुवाद. गूगल काहीपण सुचवते आजकाल. तरीपण वासरात गाय) वधुवर सूचक संकेतस्थळं हा काही वर्षांपूर्वी नवीन प्रकार होता. आता स्थळं नाहीत एवढी म्याट्रिमोनी संकेतस्थळं उपलब्ध आहेत. एवढ्या स्थळांवरून बायोडाटा गोळा करणे, त्यांची यादी करणे, त्यातून निवड करणे, इकडून तिकडून वाढीव माहिती काढणे आणि पैसे भरून फोन केल्यावर लक्षात येते कि दोन महिन्यापूर्वीच त्या पार्टीचे उरकले आहे पण अजूनही संकेतस्थळावर प्रोफाइल तसेच आहे.
आधी ओळखतीले गुरुजी किंवा आत्या, मामा च स्थळं आणायचे तरीपण दमछाक आता, त्यांच्या जोडीला ही साधनं.
५. सोशल मीडिया - याला इन्फोसिस वाली बायको मिळाली, तिला अमेरिकेचा नवरा मिळाला हे आयुष्यात कधी समोरासमोर न बोललेल्या पण फेसबुकातल्या २ हजाराव्या मित्र मैत्रिणीला पण दिसते. त्यातून मलापण असेच काहीतरी हवे ही अपेक्षा. मग अशा अवाजवी अपेक्षेतून पहिले-दुसरे चांगले स्थळ निघून जाते. आणि नंतर एवढे चांगले स्थळ सोडले आणि आता का तडजोड करायची या भावनेतून आणखी पाच-पन्नास स्थळे बघून होतात.
६. आपल्या अपेक्षा स्पष्टपणे न सांगणे. चांगल्या पगाराचा, उच्चशिक्षित, सुस्वरूप नवरा, नवरी सगळ्यांनाच हवी असते. पण "वाढलेली बौद्धिकपातळी" अशा भौतिक इच्छा आकांक्षा प्रोफाइल मध्ये उतरू देत नाही. त्यामुळे होते काय कि ज्यावेळी निर्णय घायची वेळ येते त्यावेळी आपला खरा मर्त्य, भौतिक सुखाभिलाषी माणूस प्रकट होतो आणि समोरच्या पार्टीला "तुझा रंग आवडला नाही" किंवा "एवढासा पगार?" अशा थेट उत्तराऐवजी "पत्रिका जुळत नाही" असा पुचाट निरोप कळवला जातो.
हे माझे निरीक्षण आहे. मोठ्या चुलत भावाच्या आणि मोठ्या बहिणीच्या लग्नात जातीने लक्ष घालून गहन विचार करून देखील माझ्यावेळी येरे माझ्या मागल्या. त्यामुळे हे वाचून कोणी शहाणा होईल अशी अपेक्षा नाही. माझ्या सौ ने मला तिचे पहिलेच स्थळ असून होकार दिला. त्यामुळे मी हे काय लिहिले आहे याची तिला गहराई समजणार नाही. माझ्याबरोबर तिचे बरे चालले आहे असा माझातरी समज आहे. ५ वर्षांपूर्वी लग्न होऊन मी मार्केटमधून (एकदाचा) बाहेर पडलो. त्यामुळे आणखी "प्रगती" झाली असेल तर माहित नाही.
_*_
तळटीपा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!