ऐकण्याचे कौशल्य



"ऐकणे” (लिसनिंग स्किल) हे कौशल्य कसे रूजवतां येईल हा अतिशय चांगला प्रश्न आहे.

संवादामध्ये समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेणे हे फार महत्वाचे आहे. जर आपण त्या संवादातून स्वतःच्या जाणिवेमध्ये वृद्धी नाही केली आणि आपले स्वतःचेच आधीच तयार असलेले विचार रेटले तर त्या संवादाचा आपल्याला काय उपयोग? स्वतः शहाणे आहोत हा इगो कुरवाळता येईल, पण काही मूल्यवर्धन होणार नाही.

बऱ्याचदा आपण संवाद करताना प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असतो. त्यामुळे समोरचा कधी आपलं म्हणणं संपवतोय याची आपण अधीरतेने वाट पाहतो. त्यामुळे होतं काय की समोरची व्यक्ती नक्की काय म्हंटली हे अर्धेअधिक निसटून जाते. आणि फक्त आपल्याला आधीच अपेक्षित असलेले शब्द, विचार हेच नेमके पकडून त्याच्यावरच आधारित आपले उत्तर देऊन आपण त्या संवादाची दिशा आपल्याला हवी तशी वळवतो.

पण हा सुसंवाद नाही. सुसंवादात प्रत्येक व्यक्तीला आपले विचार ऐकून घेतले गेले आणि दुसऱ्याचे विचार समजले अशी भावना आली पाहिजे.

प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संवादामध्ये चांगले ऐकण्यासाठी हे करायला हवे -

१. आपण फक्त प्रत्युत्तर देण्यासाठी ऐकत तर नाही आहोत ना याचे भान ठेवावे. काही सेकंदापुरते जरी असे वाटले तर लगेच आपले विचार गोळा करण्याचे बाजूला ठेवून परत ऐकण्यावर लक्ष केंद्रित करावे.

२. प्रत्यक्ष संवादात जर एखादा मुद्दा अशा लक्ष भरकटल्यामुळे सुटला तर समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातला प्रवाह न खंडित करता वाट बघावी आणि जागा मिळताच तो मुद्दा परत स्पष्ट करण्याची विनंती करावी.

३. संवादामध्ये एक लक्ष्य ठरवावे की पुढच्या व्यक्तीला प्रत्युत्तर देण्यापूर्वी त्याचा मुद्दा आपल्या शब्दात परत त्यांना ऐकवून त्यांना हेच म्हणायचे होते का याची खात्री करावी. त्याने तो मुद्दा तुम्हाला चांगला समजलाय का याची खात्री तर होईलच पण ऐकताना देखील तुम्ही काळजीपूर्वक ऐकाल कारण पुढच्या काही सेकंदात तुम्हाला हेच शब्द पुष्टी करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला सांगायचे आहेत.

४. जर समोरच्या व्यक्तीचे विचार स्पष्ट आणि सुसंगत नसतील तर त्याचा फायदा घेऊन त्या कमकुवत विचारांचा समाचार घेण्याऐवजी त्या विचारांना आणखी चांगल्या प्रकारे शब्दात मांडले आणि त्याची पुष्टी घेतली तर समोरची व्यक्तीदेखील त्या संवादामध्ये रमेल. "तुला जे म्हणायचे आहे ती मला समजले का बघ" म्हणून तुम्ही ते मुद्दे आणखी चांगले करून सांगू शकता. जरी तुमचे विचार त्या मुद्द्यांच्या विरोधी असले तरी असे केल्याने संवाद आणखी चांगला होईल. आणि संवाद करणाऱ्या व्यक्तींमध्ये एकमेकांच्याबाबत आदर निर्माण होईल.

५. प्रत्येक संवादामध्ये समोरच्या व्यक्तीला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे असे गृहीत धरूनच चालावे. म्हणजे 10 गोष्टींपैकी 1 गोष्ट जरी आपणाला नवी समजली तरी त्या संवादाचे सार्थक आहे.

६. समोरच्याच्या बोलण्याच्या ओघात आपला मुद्दा विसरून जाऊ अशी रुखरुख वाटत असेल आणि त्यामुळे लक्ष लागत नसेल, तर शक्य असेल तेथे आपले डोक्यातले मुद्दे लिखित स्वरूपात संक्षेपाने टिपून घ्यावेत आणि परत सवांदात लक्ष घालावे.

ऐकावे कसे हे जर समजून घ्यायचे असेल तर जो रोगन यांचा पॉडकास्ट ऐका किंवा युट्युब वर पहा. जो रोगन स्वतः एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. स्वतः अतिशय यशस्वी असूनही ते ज्या प्रकारे त्यांच्या पॉडकास्ट वर आलेल्या पाहुण्यांची मुलाखत घेतात आणि संयमाने त्यांचे मुद्दे ऐकतात हे निरीक्षण करण्याजोगे आहे. समोर इलन मस्क असुदे नाहीतर कोणी विरुद्ध विचाराचा हेकट तरुण कार्यकर्ता, ते लक्षपूर्वक सगळे ऐकून घेतात आणि नंतर एका एका मुद्याचे अवलोकन करून संवादाला अतिशय सुंदर वळण देतात.




_*_

टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक