विरळ आणि संस्मरणीय
1. सिंहेचा उल्कावर्षाव
हा उल्कावर्षाव दरवर्षी 17 नोव्हेंबर च्या पहाटे दिसतो. टेम्पल टटल हा धूमकेतू दर काही दशकांनी सुर्याजवळ येतो. या धूमकेतूने मागे ठेवलेल्या कणांमधून पृथ्वी जाते तेव्हा हे कण आणि कधीकधी मोठे दगड पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. हा उल्कावर्षाव दरवर्षी जरी घडत असला तरी काही दशकांमध्ये याचा जोर जास्त असतो. धूमकेतू जर अलीकडेच सुर्याजवळ येऊन गेला असेल तर आकाशात आतषबाजी सारख्या उल्का दिसू शकतात.
साल 1998 का 99 ला नक्की आठवत नाही. जगभरात या वर्षी leonids shower जबरदस्त होणार म्हणून उत्साह होता. मी माझ्या एका मित्राला तयार केले आणि 17 नोव्हेंबर च्या रात्री 3 वाजताच्या दरम्यान आम्ही अंधाऱ्या परेड ग्राउंडवर पोचलो. सुरवातीला मान वर करून पाहत होतो पण थोड्या वेळातच ओणवे व्हायची वेळ आली. पावसा सारख्या नाही पण मिनिटाला 4–5 उल्का पाहिल्याचे आठवते. आम्ही काही तास तो सोहळा पाहिला. त्या रात्रीनंतर मी कधीही एवढ्या मोठया प्रमाणात उल्का पहिल्या नाहीत.
Leonids - Wikipedia
2. 'तोतापुरी आंबा तोडू नका थांबा, त्याच्या कोयीत लपलाय भुंगा'
हे गाणे बऱ्याच जणांनी ऐकले असेल. पण मी जेव्हा पहिल्यांदा ऐकले तेव्हा मला भुंगा वगैरे काहीतरी उपमा किंवा शब्दखेळ वाटला होता.
तोतापुरी आंबा खरेतर मला हापूस एवढाच आवडतो. असाच एकदा घरी कापून खाताना कुटुंबाच्या वतीने कोय साफ चाटून चोखून साफ करण्याचे नेहमीचे कर्तव्य करत होतो. एक कोय ताटात होती जिच्यावर बर्यापैकी गर बाकी होता. ती घेणार तेवढ्यात गरामध्ये हालचाल जाणवली. अळी वगैरे आहेका हे बघण्यासाठी मी निरखून पाहू लागलो. आधी खाल्लेल्या फोडी पोटात आपोआप वळवळ करू लागल्या. पुढच्या पाच मिनिटात जे पाहिले ते परत कधीही दिसले नाही.
गराला हळूहळू भोक पडून खरेच त्याच्यामधून छोटासा भुंगा बाहेर निघाला.
तोतापुरी आंब्यामध्ये खरेच भुंगा असतो हे उमजून माझ्यासाठी त्या गाण्याचा आता भावार्थच बदलला होता. निसर्गाची किती उत्कट किमया आहे की नाही? हा भुंगा फळात जातो कसा आणि आता आंब्याचा गर खाल्ला गेला आहे, निघायची वेळ झाली आहे हे त्याला समजते कसे हेही कोडेच आहे.
आत्ता आंबा बघून मला हे उत्तर सुचले आणि योगायोग पहा एक भुंगा कोईच्या आजूबाजूला दिसतोय. मी तो बाहेर येताना पाहिला नाही आणि कोयीला खातानाच एक भोक पडले होते. त्यामुळे तो नक्की कोईतूनच बाहेर आला का याची शहानिशा करणे अवघड आहे. कदाचित तोतापुरी आंब्याच्या कोयीत भुंगा दिसणे एवढेही दुर्लभ नसावे.
गुणी गायिकेचा सन्मान
_*_
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!